Saturday, March 07, 2026 01:37:10 AM

Sunetra Pawar FB Post : अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण... पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

त्यानंतर मंत्रालयात सूत्रे हाती घेत त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थिती लावली. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील नव्या राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यांची भावनिक पोस्टही चर्चेत आहे.

sunetra pawar fb post  अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल झाल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयालाही भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान, आज रात्री त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील घडामोडींना वेग आला असताना मुख्यमंत्र्यांनी पहाटेच दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांचाही दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात असून पुढील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा: Mumbai Fire Incident: उद्या मुलाची वरात, आज घरातून निघाली आईची अंत्ययात्रा, भीषण आगीत 62 वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू

दरम्यान, पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार यांनी सोशल मेडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे 

"आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.

दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन." असे सुनेत्रा पवार यांनी लिहले आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीला आणि त्यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात कोणते निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Vande Metro : मुंबईकरांच्या प्रवासाचा होणार कायापालट; मुंबईत धावणार 238 'वंदे मेट्रो', पाहा काय आहे खास


सम्बन्धित सामग्री