राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी विलीनिकरणावर आपली मतं मांडायला सुरुवात केली. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या लेखामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिकात शशिकांत शिंदे यांनी लेखातून भूमिका मांडली आहे. 'विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे दिल जाणार होतं', शशिकांत शिंदे यांच्या या दाव्याने दोन्ही राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ माजली आहे. अजित पवार यांचं जे स्वप्न अपूर्ण राहिल आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असं देखील त्यांनी म्हटलं आहे. शशिकांत शिंदे यांच्या लेखामुळे पुन्हा विलीनीकरणाची चर्चांनी जोर धरला आहे. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. यानंतर आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- Sunetra Pawar: सकाळी सहाची वेळ अन् तोच जुना शिरस्ता... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पुण्यात पाळला अजितदादांचा 'हा' खास नियम
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळेस सुरज चव्हाण म्हणाले की, "अजित दादांना मानणारे नेते त्याही पक्षात भरपूर आहेत प्रत्येकाची इच्छा होती की अजित दादाच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करावं. परंतु काही लोक त्या पक्षात अजूनही असे आहेत जे सत्तेसाठी अजित दादा सोबत जाव या भावनेने विलनीकरण कराव या भावनेचे होते आणि काही लोक अजित दादाचे नेतृत्व स्वीकारून संघटनेत काम कराव अशा भावनेचे होते. आजही ते लोक कशा पद्धतीने विलनीकरणावरती चर्चा करतात ते आपण पाहतोय का? आता आमची प्रायरिटी विलनीकरण नसून आमची प्रायरिटी सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे आहे. परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे त्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहोत. आता त्यांना समजलं आहे की, आता ते सत्तेशिवाय राहू शकत नव्हते, आपण जर सत्तेच्या बाहेर पडलो तर आपला पक्ष फुटेल पक्षातील माणसं फुटतील, या भीतीने ते विलिनीकरणाबाबत म्हणत आहेत. 100 टक्के केवळ सत्तेसाठी विलिनीकरण होणार होत. हा प्रस्ताव म्हणजे फक्त आणि फक्त सत्तेसाठी होता, त्याच लोकांनी अजित दादाला निवडणुकीत गद्दार म्हणले होते आणि आज तेच लोक विलनीकरणासाठी पुढे येत आहेत".