महानगरपालिका निवडणुका पार पडून काही काळ झाला असला, तरी सत्तास्थापनेसाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. विशेषतः महापौर पद मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने ताकद लावताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे 2 नगरसेवक संपर्काबाहेर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर झळकल्यानंतर या घटनेने नवे वळण घेतले आहे. पक्षाकडून नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, खासदार संजय राऊत यांच्या सूचनेनंतर ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर माध्यमांनी संबंधित नगरसेवकांच्या घरांपर्यंत धाव घेतली. यामध्ये काही नगरसेवकांचे कुटुंबीयही संपर्कात नसल्याचे समोर आल्याने संशय अधिक गडद झाला. तसेच एका नगरसेविकेच्या पतीचाही संपर्क तुटल्याची माहिती पुढे आली.
दरम्यान, ठाकरे गटाने केलेल्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. बेपत्ता असल्याचे सांगण्यात आलेल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीच ठाकरे गटाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, मात्र त्यांना बेपत्ता ठरवून बदनामी केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक बेपत्ता की राजकीय डावपेच? या प्रश्नावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.