HSC Board Exam 2026 : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्या, 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. परीक्षेच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन तयारीचा आढावा सादर केला. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी यंदा कॉपीमुक्त परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष नियोजन केल्याचे सांगितले.
15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची कसोटी
यंदाच्या परीक्षेसाठी राज्याच्या 9 विभागीय मंडळांतून एकूण 15,32,487 विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. एकूण 3,387 केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून शाखावार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
विज्ञान शाखा: 7,99,773 विद्यार्थी
कला शाखा: 3,80,692 विद्यार्थी
वाणिज्य शाखा: 3,20,152 विद्यार्थी
इतर (ITI व व्होकेशनल): उर्वरित विद्यार्थी
प्रश्नपत्रिका वाचनासाठी '10 मिनिटे' अतिरिक्त
पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका वाचनाच्या वेळेत मोठा बदल केला आहे. पूर्वी पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जायची. मात्र यंदा, पेपर सुरू झाल्यानंतर शेवटी 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे. शाळांच्या लॉगिनवर हॉलतिकीट उपलब्ध असून ते घेतल्याशिवाय परीक्षेस बसता येणार नाही.
हेही वाचा - Ratnagiri ZP Election 2026 : रत्नागिरीत शिंदे गटाचा बोलबाला, मित्रपक्षासह विरोधी पक्षांनाही चारली पराभवाची धूळ; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
परीक्षेचा ताण घालवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती
विद्यार्थ्यांनी दडपण न घेता परीक्षा द्यावी, यासाठी बोर्डाने यंदा प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 विशेष समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय बोर्ड स्तरावर 10 मुख्य समुपदेशक उपलब्ध असतील. कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थी किंवा पालक त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज
यंदाची परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून भरारी पथकांचे जाळे विणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कॉपीचा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशासनाकडून नैतिकतेची शपथ देण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना तासाला 20 मिनिटे अतिरिक्त वेळ आणि लेखनिक यांसारख्या सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत.