Sangli ZP Election: सांगली जिल्हा परिषदेच्या म्हणजेच जिल्ह्याच्या 'मिनी मंत्रालया'च्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत आहे. खासदार विशाल पाटील यांनी आपल्या कुटुंबासह वसंतदादांचे जन्मगाव असलेल्या पद्माळे येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. "या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असून, जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल," असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी सुज्ञ मतदानाचे आवाहन
विशाल पाटील यांनी मतदारांना जागरूक राहून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "जिल्हा परिषद ही एक महत्त्वाची संस्था आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी या ठिकाणी चांगल्या माणसांनी निवडून जाणे गरजेचे आहे. सध्या देशात आणि जिल्ह्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता लोक बदल घडवण्यासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहेत. ही निवडणूक गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित होती, जी शेवटी न्यायालयाच्या आदेशामुळे घ्यावी लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा."
हेही वाचा - Zilla Parishad Election 2026 : तरुणांना लाजवणारा उत्साह! 93 वर्षीय आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या, 'सर्वांनी मतदान कराच..'
'महापालिकेप्रमाणेच भाजपचा पराभव अटळ'
भाजपच्या रणनीतीवर टीका करताना विशाल पाटील यांनी महापालिका निवडणुकीचा दाखला दिला. "भाजपने सत्ता, पैसा आणि इतर पक्षांतील माणसे गोळा करूनही महापालिकेत त्यांचा आकडा कमी झाला होता. केवळ मत विभागणीमुळे आमचा पराभव झाला होता, मात्र आमच्या आघाडीला जास्त मतदान झाले होते. आता जिल्हा परिषदेत तुम्हाला मोठा फरक दिसेल. सत्ता आणि पैशांच्या जोरावर मते मिळत नाहीत, हे या निकालातून स्पष्ट होईल," असे ते म्हणाले.
आघाडीच्या विजयाचा विश्वास
सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा पाटील यांनी केला. लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष असून बदलाची लाट असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे पाहायला मिळतील आणि महाविकास आघाडीचा वरचष्मा राहील, असे संकेतही त्यांनी दिले.