Saturday, February 14, 2026 04:02:49 AM

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणार 'मेट्रो 8'; 3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा 'मेट्रो लाईन 8' हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

cm devendra fadnavis   मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणार मेट्रो 8 3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश

CM Devendra Fadnavis : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना जोडणारा 'मेट्रो लाईन 8' हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत (1,095 दिवस) पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले असून प्रशासनाला सर्व परवानग्या युद्धपातळीवर मिळवण्याच्या सूचना केल्या आहेत. तथापी, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मेट्रो 8 प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती दिली.  

मेट्रो 8: मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचे समीकरण बदलणार

हा 35 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग मुंबईच्या दोन मोठ्या विमानतळांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी करणार आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार, यातील 9.25 किमी मार्ग भूमिगत असेल, तर 24.63 किमी मार्ग उन्नत (Elevated) असणार आहे. या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील, ज्यामध्ये 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. हा मार्ग मुंबईतील T-2 टर्मिनल ते घाटकोपर पूर्वपर्यंत जमिनीखालून जाईल, तर घाटकोपर पश्चिमपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत उन्नत मार्गावरून धावेल. या भव्य प्रकल्पासाठी साधारण 22,862 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Satara Gazetteer: जिल्हा परिषद निवडणुकांनंतर 'सातारा गॅझेट' लागू होण्याची शक्यता; मंत्रालयातील बैठकीत हालचालींना वेग

प्रशासनाला 'डेडलाईन' आणि स्पष्ट ताकीद

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच सर्व तांत्रिक आणि पर्यावरणीय परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. येत्या 6 महिन्यांत भूसंपादनासह सर्व प्रलंबित मंजुरीची कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. "काम सुपरफास्ट झाले पाहिजे आणि प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रेंगाळता कामा नये," अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

नाशिकचा परिक्रमा मार्ग आणि गडचिरोलीचा 'खनिज महामार्ग'
या बैठकीत केवळ मुंबईच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांसाठीही महत्त्वपूर्ण पायाभूत निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 66.15 किमी लांबीच्या 'शहर परिक्रमा मार्गा'ला गती देण्यात आली असून, या 3,954 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी सुरजागड ते कोनसरी दरम्यान 85.76 किमी लांबीच्या 4 पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मंजुरी देऊन नक्षलग्रस्त भागातील विकासाला चालना दिली आहे. यासोबतच समृद्धी महामार्गाच्या नागपूर-गोंदिया आणि भंडारा-गडचिरोली या विस्तारित टप्प्यांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या