Railway Police Bharti: खाकी गणवेश अंगावर चढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका तरुणाचा पोलिस भरती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपर परिसरात सुरू असलेल्या रेल्वे पोलिस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी देताना 30 वर्षीय अक्षय मिसाळ या उमेदवाराने आपला जीव गमावला. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून, यामुळे भरतीसाठी आलेल्या हजारो उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोनदा अपयश आले, पण जिद्द कायम होती
मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अक्षय मिसाळ हा रेल्वे पोलिस दलात सामील होण्यासाठी प्रचंड जिद्दीने प्रयत्न करत होता. यापूर्वी दोन वेळा भरती प्रक्रियेत त्याला अपयश आले होते, तरीही हार न मानता त्याने यंदा तिसऱ्यांदा अर्ज केला होता. याच जिद्दीपोटी तो शारीरिक चाचणी देण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते आणि भरतीचे मैदान मारण्यापूर्वीच त्याची जीवनयात्रा संपली.
धाव पूर्ण केली अन् क्षणार्धात घात झाला
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घाटकोपर येथील रेल्वे पोलिस मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. अक्षयने 1,600 मीटरची धाव यशस्वीपणे पूर्ण केली आणि तो मैदानाच्या बाजूला विश्रांतीसाठी बसला. मात्र, काही वेळातच त्याला तीव्र चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करून त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : 'विमान कंपनीला वाचवण्याचा घाट...'; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली
राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी अक्षयला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पंत नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. प्राथमिक तपासात कोणताही घातपात नसल्याचे समोर आले असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.