Friday, February 13, 2026 09:00:25 AM

Chhatrapati Sambhajinagar: निवडणूक आयोगाचा अजब कारभार! निधनानंतर 10 वर्षांनीही माजी खासदाराचे नाव यादीत

एकीकडे 'डिजिटल इंडिया' आणि 'हायटेक' निवडणूक प्रक्रियेचा दावा केला जात असताना, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र गंभीर हलगर्जीपणा पाहायला मिळत आहे.

chhatrapati sambhajinagar निवडणूक आयोगाचा अजब कारभार निधनानंतर 10 वर्षांनीही माजी खासदाराचे नाव यादीत

Chhatrapati Sambhajinagar: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच प्रशासकीय नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एकीकडे 'डिजिटल इंडिया' आणि 'हायटेक' निवडणूक प्रक्रियेचा दावा केला जात असताना, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र गंभीर हलगर्जीपणा पाहायला मिळत आहे. याचे सर्वात धक्कादायक उदाहरण म्हणजे भाजप नेते अतुल सावे यांचे वडील आणि माजी खासदार स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचे नाव तब्बल 10 वर्षांनंतरही मतदार यादीत कायम आहे. दोनवेळा खासदार राहिलेल्या मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्येच निधन झाले असूनही, 2026 च्या निवडणुकीत त्यांचे नाव यादीत झळकत असल्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तांत्रिक बिघाडांमुळेही मतदानाची प्रक्रिया विस्कळीत

केवळ मतदार याद्यांमधील चुकाच नव्हे, तर तांत्रिक बिघाडांमुळेही मतदानाची प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गुजराती कन्या विद्यालय केंद्रावर ऐन मतदानाच्या वेळी ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल एक तास मतदान थांबले होते. यामुळे मतदारांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले, परिणामी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशीच परिस्थिती राज्याच्या इतर भागातही पाहायला मिळाली. 

हेही वाचा - Shashank Ketkar Thane Video : "ज्या शाळेत मतदान केलं, त्या शाळेच्या मागे..." मतदान केल्यानंतर शशांकने दाखवली ठाण्यातील खरी परिस्थिती

अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिराने सुरू 

दरम्यान, मुंबई, पुणे, सोलापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिराने सुरू झाली. काही ठिकाणी बटण दाबले जात नसल्याच्या, तर अनेक ठिकाणी यादीतून नावे गायब झाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांची मोठी फरफट होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - BMC Election 2026: "मराठी विरुद्ध अमराठी" मुंबईच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मेसेजवरूनच जुंपली

तथापी, 2015 मध्ये वडिलांचे निधन होऊनही आजही त्यांचे नाव यादीत असणे हे धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने याद्यांचे शुद्धीकरण नेमके कसे केले? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. तांत्रिक बिघाड आणि याद्यांमधील सावळागोंधळ यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आणि नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 


सम्बन्धित सामग्री