मुंबई : राज्यातील 29 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज, गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौरपद आरक्षित आहे की खुले प्रवर्गासाठी आहे, हे स्पष्ट होईल. राज्यात 15 जानेवारी रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई -विरार, भिवंडी -निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, छत्रपती संभांजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड या 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षेतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदाची आरक्षण सोडत निघेल. हे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाईल. याआधीचे आरक्षण बाजूला ठेवण्यात येईल. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला आहे. सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी सोडत निघेल. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल. यात महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असणार आहे.
हेही वाचा : KDMC Mayor : महापौर पदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं! कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचाच महापौर