Friday, March 13, 2026 10:36:57 PM

ZP Election Result 2026: ग्रामीण महाराष्ट्रात 'कमळ' फुललं; शिंदे गटाची सेंच्युरी, जाणून घ्या झेडपी निवडणुकीचा सविस्तर निकाल

दुपारपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, राज्याच्या ग्रामीण राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

zp election result 2026 ग्रामीण महाराष्ट्रात कमळ फुललं शिंदे गटाची सेंच्युरी जाणून घ्या झेडपी निवडणुकीचा सविस्तर निकाल

ZP Election Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या 'मिनी मंत्रालया'चा फैसला आज अखेर स्पष्ट झाला आहे. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, राज्याच्या ग्रामीण राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही 100 जागांचा टप्पा ओलांडून आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.

पक्षनिहार सद्यस्थिती (दुपारी 2 वाजेपर्यंतचे कल) 
एकूण 731 जिल्हा परिषद जागांपैकी 564 जागांचे कल आणि निकाल हाती आले असून चित्र स्पष्ट होत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) 198 जागांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे गट) 124, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 115, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 44, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 36, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 13 जागांवर आहे. इतर व अपक्षांनी 34 जागांवर आपली पकड मिळवली आहे.

कोकणात महायुतीचे वर्चस्व आणि बिनविरोध विजय 
यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदानापूर्वीच महायुतीने 27 जागांवर विजय मिळवला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकून विरोधकांना सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. रत्नागिरी आणि रायगडमध्येही शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, कोकणचा गड महायुतीने पुन्हा एकदा भक्कम केला आहे.

हेही वाचा - ZP Election Results 2026: ‘भाजपचा सुपडा साफ करणे सोपे नाही’; पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी विरोधकांवर साधला निशाणा

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा 'विजयरथ' 
राज्यात भाजप जरी नंबर 1 असला तरी, पुणे जिल्हा परिषदेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. पुण्यातील एकूण 73 जागांपैकी 39 जागा जिंकत राष्ट्रवादीने बहुमताचा 37 हा आकडा यशस्वीपणे पार केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर मिळालेला हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, राष्ट्रवादीने आपला पुण्याचा गड राखण्यात यश मिळवले आहे.
 


सम्बन्धित सामग्री