Friday, March 13, 2026 07:07:53 AM

ZP Result 2026: मिनी विधानसभेत महायुतीचा डंका; 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा, ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही

&quotशहरी पक्ष&quot ही ओळख पुसून काढत भाजपने 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर एकहाती सत्ता मिळवली आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेने 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (2) जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

zp result 2026 मिनी विधानसभेत महायुतीचा डंका 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही

ZP Result 2026: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रातील 34 पैकी 12 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या या निवडणुकांमध्ये भाजपने ग्रामीण भागात आपला झेंडा भक्कमपणे रोवला आहे. "शहरी पक्ष" ही ओळख पुसून काढत भाजपने 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर एकहाती सत्ता मिळवली आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेने 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (2) जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांमुळे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला एकाही जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आलेली नाही, जो त्यांच्यासाठी मोठा राजकीय फटका मानला जात आहे.

दिग्गजांचे 'सोयरे' अडकले 
या निवडणुकांमध्ये प्रस्थापित नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना रिंगणात उतरवून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, मतदारांनी अनेक 'घरंदाज' उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे.

धक्के बसलेले नेते: माजी मंत्री सुरेश वरपूडकर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रायगडचे आमदार रवींद्र पाटील आणि लातूरचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नातेवाईकांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

विजयी उमेदवार: भरत गोगावले आणि राम सातपुते यांचे नातेवाईक मात्र मोठ्या फरकाने विजयी होऊन गुलाल उधळण्यात यशस्वी ठरले आहेत.

सोशल मीडियाचे 'स्टार' जमिनीवर; फॉलोअर्सची जादू चालली नाही 
या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा पराभव. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष मतपेटीत मात्र जादू दाखवता आली नाही. पुण्यातील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या निर्मला नवले यांचा पराभव झाला. छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध सरपंच, ज्यांचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, त्यांनाही मतदारांनी नाकारले. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष जमिनीवरील मते यात मोठे अंतर आहे.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपच मोठा पक्ष; तर शिंदेसेनेच्या आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

अजून 22 जिल्हा परिषदांचा रणसंग्राम बाकी 
आजचे निकाल केवळ 12 जिल्हा परिषदांचे असले तरी खरा खेळ अजून बाकी आहे. राज्यातील उर्वरित 22 जिल्हा परिषदा आणि 226 पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. आगामी काळात होणाऱ्या या निवडणुकांवर आजच्या निकालांचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महायुतीने ग्रामीण महाराष्ट्रात वर्चस्व मिळवून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली बाजू भक्कम केल्याचे चित्र दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री