Thursday, March 12, 2026 10:07:01 PM

Amol Mitkari Speech: 'माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा...'; विधानसभेत अमोल मिटकरींचा कंठ दाटला

'माझे शेणाचे हात पेनाला लावणारा किमयागार म्हणजे माझे दैवत अजितदादा होते,' अशा शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

amol mitkari speech माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा विधानसभेत अमोल मिटकरींचा कंठ दाटला

Amol Mitkari Speech: 'ज्या माणसाच्या घरात ग्रामपंचायत सदस्यत्वाचाही वारसा नव्हता, अशा एका सामान्य वक्त्याला अजितदादांनी थेट विधिमंडळात पोहोचवलं. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा किमयागार म्हणजे माझे दैवत अजितदादा होते,' अशा शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावादरम्यान मिटकरी यांनी दादांसोबतचा आपला प्रवास उलगडला.

बारामतीचे ते व्याख्यान आणि दादांची नजर
अमोल मिटकरींनी आपल्या भाषणात 2019 सालच्या त्या प्रसंगाची आठवण सांगितली, ज्याने त्यांचे आयुष्य बदलले. बारामतीच्या शारदा प्रांगणात संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिटकरींचे व्याख्यान होते. दादा केवळ उद्घाटनाला आले होते, पण वक्त्याचे नाव आणि विषय वाचून त्यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला. दोन तास 15 मिनिटे दादांनी एका सामान्य कार्यकर्त्याचे भाषण श्रोत्यांमध्ये बसून ऐकले. त्या एका व्याख्यानाने मिटकरींनी दादांचे मन जिंकले होते.

"हा बुथ बांधणीचा माणूस नाही, हा मैदान मारणारा गडी आहे!"
व्याख्यानानंतर तीन महिन्यांनी दादांनी मिटकरींना मुंबईला बोलावले. त्यावेळी पक्षात येण्याची ऑफर देताना जयंत पाटील यांनी त्यांना 'बुथ बांधणी'च्या कामाला लागण्यास सांगितले. मात्र, कडक शिस्तीच्या दादांनी मिटकरींमधील वक्ता ओळखला होता. दादा मिश्कीलपणे म्हणाले, "हा बुथ बांधणीचा माणूस नाही, हा मैदान मारणारा गडी आहे, याला महाराष्ट्रभर फिरवा." त्यानंतर शिवस्वराज्य यात्रेतून मिटकरींचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

हेही वाचा -  Shashikant Shinde On Ladaki Bahin Yojna : "दादांना श्रद्धांजली म्हणून आता या योजनेला..." चालू अधिवेशनात शशिकांत शिंदेंनी केली मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?

प्रचारासाठी हेलिकॉप्टर आणि आमदारकीचा 'तो' सुखद धक्का
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरींच्या सभांना प्रचंड मागणी वाढली. त्यावेळी दादांनी स्वतः एका सामान्य कार्यकर्त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. मिटकरींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत तब्बल 68 सभा घेतल्या. एका पराभव मेळाव्यात जेव्हा कार्यकर्ते विधान परिषदेच्या जागेसाठी मागणी करत होते, तेव्हा दादांनी ठणकावून सांगितले, "त्या पोराने (मिटकरी) पक्षासाठी जीवाचं रान केलंय, मी आमदार करेन तर त्यालाच करेन!" अमरावतीत एका कार्यक्रमात असताना टीव्हीवर ही बातमी पाहून मिटकरींना आनंदाचा धक्का बसला होता. अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, "दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटले तरी त्यांचं मन अतिशय मृदू होतं. आज मी जो काही आहे, तो केवळ त्यांच्यामुळेच." हे बोलताना मिटकरींचे डोळे पाणावले होते आणि संपूर्ण सभागृह शांत झाले होते.


सम्बन्धित सामग्री