PAU Machine Controversy : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या 'पाडू' (PAU) मशीनवर घेतलेल्या आक्षेपाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 'ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची खात्री पटली असून, त्यातूनच ते आतापासून ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत,' अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली.
'पाडू' मशीनच्या वादावर बावनकुळेंचा पलटवार
राज ठाकरे यांनी ईव्हीएमसोबतच्या नवीन युनिटवर शंका उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, 'जेव्हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा पराभव निश्चित असतो, तेव्हाच त्यांना मशीनमध्ये दोष दिसू लागतात. जिथे ते जिंकतात तिथे मशीनवर प्रश्न विचारले जात नाहीत. हा केवळ पराभवाच्या भीतीतून केलेला थयथयाट आहे.' मुंबईची जनता विकासाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या पाठीशी उभी आहे, हे त्यांना ठावूक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - Mumbai High Court : मोठी बातमी! 'चुकीची विधाने कशी काय करू शकता...', म्हणत मनसे नेत्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मतदानापूर्वीच्या भेटीगाठींचे समर्थन
मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांना मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास आयोगाने मुभा दिली आहे, यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. यावर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही जाहिराती किंवा हँडबिलशिवाय मतदारांच्या घरी जाणे हे निवडणूक आयोगाच्या नियमातच बसते. मतदानाच्या दिवशी प्रतिष्ठित लोक किंवा कार्यकर्त्यांच्या घरी जाण्यात काहीही गैर नाही, असे समर्थन त्यांनी केले.
हेही वाचा - Green Theme Polling Booth : नुसतं मतदान नाही, तर सामाजिक संदेशही; राज्यातील या 'ग्रीन थीम' मतदान केंद्राची राज्यभर चर्चा, नेमका काय आहे विषय?
अजित पवारांच्या आरोपावर संताप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1999 सालच्या सिंचन प्रकल्पाचा संदर्भ देत भाजपवर 'पार्टी फंडा'साठी पैसे घेतल्याचा जो आरोप केला, त्यावर बावनकुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 1999 च्या फाईलवर अजित पवारांनी आज भाष्य करणे हास्यास्पद आहे. एवढ्या वर्षांनी असे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे खडे बोल त्यांनी यावेळी सुनावले.