Thursday, March 12, 2026 10:37:25 PM

Corrupt Countries : विकसित देशांचा बुरखा फाटला, अमेरिका-ब्रिटनमध्ये भ्रष्टाचारात वाढ; ग्लोबल ट्रान्सपरन्सीने केलेल्या अहवालात धक्कादायक खुलासा

2024 च्या तुलनेत 2025 मध्ये भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले असून देशाच्या मानांकनात सकारात्मक सुधारणा झाली आहे.

corrupt countries  विकसित देशांचा बुरखा फाटला अमेरिका-ब्रिटनमध्ये भ्रष्टाचारात वाढ ग्लोबल ट्रान्सपरन्सीने केलेल्या अहवालात धक्कादायक खुलासा

Corrupt Countries : 'ग्लोबल ट्रान्सपरन्सी'ने जगातील 180 देशांचा भ्रष्टाचार निर्देशांक (Corruption Perceptions Index) नुकताच जाहीर केला असून, यामध्ये भारतासाठी दिलासादायक वृत्त आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण घटले असून देशाच्या मानांकनात सकारात्मक सुधारणा झाली आहे. मात्र, जागतिक स्तरावर युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रगत आणि विकसित देशांमध्ये भ्रष्टाचाराचा आलेख उंचावल्याचे या अहवालातून समोर आले असून ही बाब जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची मानली जात आहे.

भारताची वाटचाल: सुधारणा पण आव्हाने कायम
गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण आणि सकारात्मक पावले पडताना दिसत आहेत. भारताचे रँकिंग खालीलप्रमाणे सुधारले आहे:
2023: 93 वे स्थान
2024: 92 वे स्थान
2025: 91 वे स्थान

जरी भारत दरवर्षी एका पायरीने वर सरकत असला, तरी विकसित देशांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी आणि पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी देशाला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

जगातील 'स्वच्छ' आणि 'भ्रष्ट' देश
अहवालानुसार, पारदर्शकतेच्या बाबतीत काही देशांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. डेन्मार्क हा देश पुन्हा एकदा जगातील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला म्हणजेच सर्वात 'प्रामाणिक' देश ठरला आहे. याउलट, सोमालिया आणि दक्षिण सुदान हे देश यादीत सर्वात तळाला असून ते जगातील सर्वाधिक भ्रष्ट देश म्हणून घोषित झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिका (29 वे स्थान) आणि ब्रिटन यांच्या मानांकनात मोठी घसरण झाली आहे. ब्रिटनने आपली पत गमावली असून तो पहिल्या 20 देशांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे.

हेही वाचा - Goa Tourism: परदेशी पर्यटकांसोबत सेल्फी घेणं आता जोखमीचं; गोवा पोलीस ॲक्शनमोडवर, ‘परवानगीशिवाय फोटो-व्हिडिओ काढल्यास...'

युरोप आणि अमेरिकेसमोर चिंतेचे वातावरण
अहवालातील इतर महत्त्वाचे निष्कर्ष प्रगत देशांमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहेत. युरोपमधील जवळपास सर्वच देशांत भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले असताना केवळ जर्मनीने आपली स्थिती सुधारून अपवाद ठरवला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवूनही अमेरिकेचे रँकिंग 28 वरून घसरून 29 वर आले आहे. भारताचा शेजारील देश असलेल्या चीनची स्थिती 76 व्या क्रमांकावर स्थिर असून, तिथे भ्रष्टाचारात कोणतीही मोठी घट दिसून आलेली नाही. 


सम्बन्धित सामग्री