Friday, March 06, 2026 08:35:03 AM

Devendra Fadnavis On AI: 'जग भारताची प्रशंसा करतंय, पण विरोधक मात्र...'; देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

महाराष्ट्राने एआय आणि कृषी क्षेत्रात घेतलेली झेप ऐतिहासिक असून 'महाविस्तार' सारख्या प्लॅटफॉर्ममुळे राज्य आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

devendra fadnavis on ai जग भारताची प्रशंसा करतंय पण विरोधक मात्र देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

Devendra Fadnavis On AI: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात निर्माण केलेली शक्ती आज संपूर्ण जग अनुभवत आहे. जागतिक स्तरावरील नामवंत नेत्यांनी भारतात येऊन या प्रगतीचे कौतुक करणे ही अभिमानाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राने एआय आणि कृषी क्षेत्रात घेतलेली झेप ऐतिहासिक असून 'महाविस्तार' सारख्या प्लॅटफॉर्ममुळे राज्य आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

'महाविस्तार' प्लॅटफॉर्म: शेतकऱ्यांसाठी डिजिटल वरदान
मुख्यमंत्र्यांनी 'महाविस्तार' या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या महत्त्वावर विशेष प्रकाश टाकला. ते म्हणाले की, हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच व्यापक प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत पीक चक्र (Crop Cycle), खतांची माहिती, बाजारपेठेतील दर आणि सरकारी योजनांची पारदर्शक माहिती थेट उपलब्ध होत आहे. विशेषतः कीड नियंत्रणासारख्या (Pest Control) विषयात अचूक माहिती मिळाल्याने शेती उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारनेही महाराष्ट्राच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, यामुळेच राज्याला या विषयावरील विशेष सत्राचे यजमानपद मिळाले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. 

हेही वाचा - Sanjay Shirsat on Ganesh Naik: 'गणेश नाईक भाजप सरकारलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत'; संजय शिरसाटांनी नाईकांना सुनावले खडेबोल

हवामान बदलाशी लढा आणि शाश्वत शेती
सध्या हवामान बदलाचा (Climate Change) सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने 'क्लायमेट रेसिलीयंट' म्हणजेच हवामान बदलाचा सामना करणारी शाश्वत शेती विकसित करण्यावर भर दिला आहे. "हवामान बदलाला तोंड देणारी शेती हाच भविष्यातील मार्ग आहे आणि महाराष्ट्राने यात पुढाकार घेतला आहे. आम्ही आमचे हे अनुभव इतर राज्यांसोबत शेअर करण्यास तयार आहोत, जेणेकरून देशाला याचा फायदा होईल," असेही फडणवीस यांनी नमूद केले.

डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागतिक बाजारपेठ
राज्यातील कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 'डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर' (DPI) उभारण्यावर सरकारचा भर आहे. या प्रणालीमुळे उत्पादनांची 'ट्रेसिबिलिटी' वाढेल. म्हणजेच, एखादे उत्पादन कुठे तयार झाले, त्यात कोणती रसायने वापरली गेली, याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असेल. यामुळे महाराष्ट्राचा शेतीमाल जागतिक मानकांनुसार पात्र ठरेल आणि शेतकऱ्यांना मोठा नफा मिळेल.

कृषी विद्यापीठांचा सहभाग आणि विरोधकांवर टीका
या संपूर्ण प्रक्रियेत राज्यातील कृषी विद्यापीठांनाही जोडून घेण्यात आले आहे. शास्त्रज्ञांची सल्लागार भूमिका आणि तांत्रिक मदत यामुळे हा प्लॅटफॉर्म अधिक सक्षम होत आहे. दरम्यान, विरोधकांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, "एकीकडे जग भारताच्या एआय क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक करत असताना, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मात्र केवळ नकारात्मकता पसरवून देशाला बदनाम करण्याचे काम करत आहेत. एखादी छोटी घटना पकडून देशाची प्रतिमा मलिन करणे ही देशहिताची प्रवृत्ती नाही."
 


सम्बन्धित सामग्री