Tuesday, February 17, 2026 05:04:19 PM

Abu Azmi : 'मला त्यांनी खूप वेळा पक्षात बोलवलं, पण...', अबू आझमींचा नेमका कोणावर निशाणा?

त्यांनी मला अनेकदा पक्षात बोलावले, पण मी त्यांच्यावर थुंकलोही नाही, अशा तिखट शब्दांत आझमींनी आपला संताप व्यक्त केला.

abu azmi  मला त्यांनी खूप वेळा पक्षात बोलवलं पण अबू आझमींचा नेमका कोणावर निशाणा

Abu Azmi Speech : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी भिवंडीतील एका प्रचार सभेत बोलताना भाजप आमदार आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांना वाटतं मी आमदार, मी आमदार, पण काय असतो आमदार? मी चार वेळा आमदार आणि एकदा खासदार झालोय, पण मला त्याचा कधीच गर्व झाला नाही. त्यांनी मला अनेकदा पक्षात बोलावले, पण मी त्यांच्यावर थुंकलोही नाही, अशा तिखट शब्दांत आझमींनी आपला संताप व्यक्त केला.

नितेश राणेंना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी 

मुस्लिम समुदायाबद्दल नितेश राणे वारंवार अपमानजनक विधाने करत असल्याचा आरोप करत, आझमींनी त्यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली. आमदार आणि मंत्री म्हणून संविधानाची शपथ घेतल्यावर सर्वांना समान न्याय देणे अपेक्षित असते. मात्र, नितेश राणे वारंवार मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये करत आहेत. जर देशात खरा न्याय असता, तर अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसते, असेही ते म्हणाले. तसेच, राणेंनी आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - Mahapalika Election 2026 : प्रचारासाठी कायपण! कार्यकर्त्यांनी चक्क केसात कोरले शिवधनुष्य, Photo Viral

काँग्रेसवरही साधला निशाणा; टिपू सुलतानचा दिला दाखला

आझमी यांनी केवळ भाजपवरच नव्हे, तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबद्दल केलेल्या विधानावरून आझमींनी नाराजी व्यक्त केली. ऐतिहासिक दाखला देताना ते म्हणाले, टिपू सुलतान का हरला? कारण त्याच्या सैन्यात काही लोकांनी फितुरी केली होती. काँग्रेसही सध्या ऐतिहासिक व्यक्तींवर वादग्रस्त टिप्पण्या करून स्वतःला नष्ट करत आहे. सपकाळ यांचे विधान ही काँग्रेसची राजकीय आत्महत्या असल्याचे सांगत, काँग्रेस अल्पसंख्याक समुदायातील विश्वासार्हता गमावत असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा - PCMC Election 2026: अजितदादांचा 'स्वॅग'च न्यारा, कार्यकर्त्याला भर सभेत म्हणाले 'तुझं ते लव्ह यू घरी जावून...'; नेमकं काय घडलंय?

हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचा पुरस्कार 

मुस्लिम समाज नेहमीच हिंदू-मुस्लिम बंधुत्वाबद्दल बोलतो, पण काही लोक मुद्दाम नकारात्मक विधाने करून द्वेष पसरवत आहेत, असा आरोप आझमींनी केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आझमींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
 


सम्बन्धित सामग्री