मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेतून घेतले. या हॉटेलची किंमत 110 कोटी होती, परंतु ते केवळ 67 कोटी रुपयांत विकण्यात घेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या व्यवहारातून त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांना घेरले होते. त्याला गुरुवारी संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. लिलाव प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे. ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही, ते असे बोलतात, असे संजय राऊत यांचे नाव न घेता शिरसाट यांनी म्हटले आहे.
हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेवरुन खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर भाष्य केले. छत्रपती संभाजीनगरातील महत्त्वाच्या जागेवर असणारे हॉटेल विट्सची मूळ किंमत 110 कोटी आहे. पण मंत्री शिरसाट यांच्या मुलासाठी हॉटेल केवळ 67 कोटी रुपयांना विकत घेतले असा दावा खासदार राऊत यांनी केला. या संपूर्ण व्यवहारावर त्यांनी आक्षेप घेतला. तसेच लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : 'मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा'; महिला आयोगाचे फडणवीसांना पत्र
काय आहे प्रकरण?
संजय शिरसाट यांचे सिद्धांत शिरसाट यांच्या मालकीच्या मेसर्स सिद्धांत साहित्य खरेदी पुरवठा कंपनीने हे हॉटेल खरेदी केल्याचे उघड झाले आहे. पूर्वी हॉटेल वेदांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आता हॉटेल विट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मालमत्तेचा लिलाव धनदा लिमिटेडच्या नावे होता.
दरम्यान लिलावात भाग घेणाऱ्या इतर स्पर्धकांच्या बोली रक्कमांमध्ये मुद्दाम फरक दाखवण्यात आला, जेणेकरुन ही मालमत्ता सिद्दांत शिरसाट यांनाच मिळेल असा आरोप शिउबाठा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.