Thursday, July 17, 2025 02:47:28 AM

आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिंड्यांना श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

आषाढी वारीत स्वच्छता व सामाजिक जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या तीन दिंड्यांना 'श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार' जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पार पडणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यातील तीन दिंड्यांना यंदा 'श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. या दिंड्यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशी दिवशी करण्यात येणार आहे.

ही माहिती श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पुरस्कारासाठी निवड झालेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार आणि 50 हजार रुपये रकमेचा धनादेश व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

हेही वाचा: राम मंदिराच्या काही कारणामुळे नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

वारकरी संप्रदायाची पंढरपूर पायी वारी ही महाराष्ट्राची एक अनमोल अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा जपण्यासाठी वारी स्वच्छ, निरामय ठेवणं गरजेचं आहे. सामाजिक प्रबोधनासाठी अनेक दिंड्या पर्यावरण, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती, व्यसनमुक्ती आणि स्त्रीभ्रूणहत्या याविषयी जनजागृती करतात.

याच पार्श्वभूमीवर, श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीमार्फत 2018 पासून “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार' सुरू करण्यात आला आहे. इतर दिंड्यांनीही याचा आदर्श घ्यावा व “निर्मल वारी, हरीत वारी' अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन समितीकडून करण्यात आलं आहे.

या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी अ‍ॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ आणि वृक्षमित्र ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री