मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे. 'ठाकरे बंधू एकत्र येणार का?' राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशाचे दावेदार मानले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत दोघांची वाटचाल वेगळी झाली. आता पुन्हा एकदा दोघे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याला कारणीभूत ठरले आहे गिरगावमध्ये झळकलेले एक बॅनर.
गिरगाव परिसरात नुकतेच काही बॅनर लावण्यात आले, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत. बॅनरवर लिहिलं आहे '8 कोटी जनता एकत्र येण्याची वाट पाहत आहे.' या एकाच ओळीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ही बॅनरबाजी अचानक झालेली नसून, ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचं मानलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येते आहे, तसतशी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेला गिरगावमधील बॅनरमुळे नवसंजीवनी मिळाली आहे.
गिरगाव परिसरात जनतेचीही यावर उत्सुकता वाढली आहे. काहींना वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने एकत्र आणायचं असेल, तर दोघांनी एकत्र यायला हवं. तर काहीजण मात्र म्हणतात की, हे केवळ राजकीय खेळीचा भाग असू शकतो.
यासंदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी गिरगावमधून घेतलेला आढावा महत्त्वाचा आहे. स्थानिक नागरिकांनीही यावर आपली मतं मांडली आहेत. काहींनी सांगितलं की, 'राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली आणि उद्धव ठाकरे यांचं प्रशासनातलं अनुभव एकत्र आल्यास नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होऊ शकते.'
हेही वाचा: फक्त सभांना गर्दी असून चालत नाही, गर्दीचे मतपरिवर्तन होणे महत्वाचे; पवारांचा ठाकरे बंधू युतीवर राजकीय इशारा
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट किंवा मनसेच्या अधिकृत वर्तुळातून या बॅनरबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यांमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. राऊत यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'राज आणि उद्धव यांच्यात फोनवर बोलणं झालं असावं,' ज्यामुळे गुप्त राजकीय हालचालींच्या चर्चांना ऊत मिळाला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ दोन नेत्यांचं नव्हे, तर दोन विचारधारा, दोन शैली आणि दोन वेगवेगळ्या जनाधारांचा संगम होऊ शकतो. येत्या काळात हे खरोखर शक्य होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण ठराविक मतदारांमध्ये प्रभाव टाकू शकतं.
हेही वाचा: भाजपाने महाराष्ट्र संपवण्याचं काम सुरू केलंय; संजय राऊतांचा भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल
एकंदरीत, गिरगावमधील बॅनरबाजीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू केली आहे. आता पाहायचं एवढंच की, ही केवळ चर्चेपुरती मर्यादित राहते की प्रत्यक्षात ठाकरे बंधू एकत्र येतात.