Sanjay Shirsat: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रलंबित वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. "जेव्हा आम्ही उठाव केला, त्यावेळेला पक्षाचे असलेले संख्याबळ आणि सदस्य नोंदणी या सर्व तांत्रिक बाबींमध्ये आम्ही परिपूर्ण आहोत. त्यामुळे धनुष्यबाण आणि पक्ष याबाबतचा निर्णय आमच्याच बाजूने लागेल, याची आम्हाला खात्री आहे," असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. आजच्या सुनावणीत आमची बाजू भक्कमपणे मांडली गेली असून निकालावर आताच अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर घणाघाती टीका
शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेचा संदर्भ देत शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. "शिवसेनाप्रमुखांनी जो ताठ कण्याचा मराठी माणूस घडवला आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी शिवसेना बांधली, त्या शिवसेनेची अवस्था आज बदलली आहे. या लोकांनी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले आहे. त्यांची विचारधारा आता पूर्णपणे बदलली असून, त्यांचे हिंदुत्व नेमके कुठे गेले, हेच समजत नाही," असा टोला शिरसाट यांनी लगावला. तसेच, मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात असताना या लोकांनी काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - SC On Shiv Sena : शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कोणाचं? सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली; आता 'या' दिवशी होणार फैसला
सत्तास्थापनेची सूत्रे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे
मुंबई आणि इतर ठिकाणच्या सत्तास्थापनेबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, "आमच्या संख्याबळाच्या आधारावर नेमकी काय मागणी करायची, याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच घेतील. या विषयावर फार मोठी चर्चा करण्याची गरज नाही, कारण अंतिम निर्णय हे दोन्ही नेते मिळून घेतील." सत्तेसाठी आम्ही कोणाच्याही मागे धावणार नाही, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
'एमआयएम'सोबतच्या युतीचा शक्यता फेटाळली
दरम्यान, एमआयएम (MIM) सोबतच्या युतीच्या चर्चेवर शिरसाठ यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडली. "आम्हाला एमआयएम नकोच. सत्तेसाठी आम्ही एवढे लाचार नाही की कोणालाही सोबत घेऊन सत्ता स्थापन करू. कोणालाही सोबत धरून चालणे आमच्या स्वभावात नाही आणि आमचा तसा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही," असे स्पष्ट करत त्यांनी युतीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.