Friday, February 13, 2026 06:40:27 PM

Municipal Corporation Election Result: काँग्रेस–वंचितच्या मदतीशिवाय सत्ता अशक्य? आकड्यांनी भाजप-शिवसेनेची नवी रणनीती

मतदान पुनर्मोजणीने भाजपला धक्का बसला असून, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 39 जागांसाठी आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरणार आहेत.

municipal corporation election result काँग्रेस–वंचितच्या मदतीशिवाय सत्ता अशक्य आकड्यांनी भाजप-शिवसेनेची नवी रणनीती

उल्हासनगर: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीने अखेरच्या क्षणापर्यंत आपला ‘थ्रिलर’ कायम राखला. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही बलाढ्य पक्षांमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या भाजपला अखेरच्या क्षणी झालेल्या पुनर्मोजणीने धक्का दिला असून, आता भाजप आणि शिवसेना दोन्ही 37-37 या समसमान आकड्यावर येऊन थांबले आहेत. 78 जागांच्या या सभागृहात बहुमतासाठी 39 चा आकडा गाठणे आवश्यक असल्याने, आता सत्तेची सर्व सूत्रे काँग्रेस (1) आणि वंचित बहुजन आघाडीच्या (2) एकूण 3 उमेदवारांच्या हाती एकवटली आहेत.

काल सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर उत्साहाचे आणि तणावाचे वातावरण होते. सुरुवातीच्या कलानुसार भाजपने 38 जागांवर विजय मिळवत ‘मोठा भाऊ’ ठरल्याचा जल्लोष सुरू केला होता. मात्र, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाट्यमय घडामोड घडली. प्रभाग क्रमांक 16 ‘अ’ मध्ये भाजपचे पवन वाघ आणि साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांच्यात चुरस होती. अवघ्या काही मतांच्या फरकाने निकाल लागल्याने दीप्ती दुधानी यांनी पुनर्मोजणीची मागणी केली. या फेरमोजणीत दुधानी यांनी 74 मतांनी बाजी मारली आणि भाजपचा आकडा 38 वरून 37 वर घसरला, तर शिवसेना साई युती 37 वर पोहोचली.

हेही वाचा: Devendra Fadnavis: ठाकरेंना डिवचणाऱ्या राणेंचे मुख्यमंत्र्यांनी असे टोचले कान, म्हणाले "विजयाचा उत्सव साजरा करा पण ... "

निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने टीओके (TOK), साई पक्ष आणि आरपीआय (आठवले गट) यांच्याशी युती करून भाजपला एकाकी पाडण्याची रणनीती आखली होती. भाजपने आपली संपूर्ण ताकद आणि सुसज्ज प्रचारतंत्राचा वापर केला, तरीही शिवसेनेच्या अंतर्गत स्थानिक बंडाळीचा आणि तिकीट वाटपातील कुरघोड्यांचा फटका युतीला बसल्याचे दिसते. प्रभाग क्रमांक 4, 10 आणि 20 मधील अंतर्गत कलहामुळे शिवसेनेला हातच्या 6 जागा गमवाव्या लागल्या, ज्यामुळे भाजपला मुसंडी मारण्याची संधी मिळाली.

अल्प मतदानाचा कल असलेल्या उल्हासनगरमध्ये यावेळी मतदारांनी अनपेक्षित उत्साह दाखवत 52.10 टक्के मतदानाचा टक्का नोंदवला होता. वाढीव मतांचा हा कौल कुणाच्या पारड्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मतमोजणीच्या मध्यापर्यंत भाजप 25 आणि शिवसेना 24 अशा फरकाने पुढे मागे होत होते. मात्र, शिवसेनेने आपल्या बालेकिल्ल्यात पकड मजबूत ठेवली, तर भाजपने अनेक नवीन प्रभागांमध्ये अनपेक्षित विजयाची नोंद केली. 78 जागा लढवूनही शिवसेनेला 36-37 जागांवर समाधान मानावे लागणे, हे त्यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय ठरत आहे.

आता या राजकीय पेचप्रसंगात ‘किंगमेकर’ची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. प्रभाग 18 मधून वंचित बहुजन आघाडीचे सुरेश सोनवणे आणि विकास खरात हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत, तर याच प्रभागातून काँग्रेसच्या अंजली साळवे यांनीही बाजी मारली आहे.

बहुमताचा 39 हा जादूई आकडा पूर्ण करण्यासाठी भाजप असो वा शिवसेना, या दोघांनाही आता या 3 शिलेदारांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ आता वंचित आणि काँग्रेसच्या हाती गेला असून, महापौर कुणाचा होणार यासाठी राजकीय सौदेबाजीला वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Pune Election Result 2026: पुणे महापालिकेत कौटुंबिक राजकारणाचा बोलबाला; एकीकडे सख्खे भाऊ तर दुसरीकडे सासू-सून


सम्बन्धित सामग्री