उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीने सध्या शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापौरपद 'नागरिकांचा मागासवर्ग' (OBC) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खलबते सुरू आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि टीम ओमी कलानी यांची युती सत्तेच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, संख्याबळ अधिक असूनही महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महापालिकेच्या एकूण 78 जागांच्या गणितात सत्तेची चावी सध्या शिंदे गटाकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीत भाजपला 37 जागा मिळाल्या, तर काँग्रेसचा एक उमेदवार सोबत घेऊन 38 चा आकडा गाठण्यात भाजपला यश आले, मात्र सत्तास्थापनेसाठी लागणारा 'मॅजिक फिगर' त्यांच्यापासून दूर राहिला. दुसरीकडे, शिंदे गटाने राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत टीम ओमी कलानी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची मोट बांधली आहे. शिंदे गटाचे स्वतःचे 22, साई पक्ष एक, वंचित दोन आणि टीम ओमी कलानीचे 14 अधिक एक अपक्ष असे मिळून एकूण 40 नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ त्यांच्याकडे तयार झाले आहे.
येथेच खरा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. युतीमध्ये शिंदे गटाकडे 25 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असतानाही, महापौरपद 'टीम ओमी कलानी'ला दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्वतःचे संख्याबळ जास्त असूनही ओमी कलानी गटाला महापौरपद दिल्यास शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे पक्षश्रेष्ठींसाठी सोपे राहिलेले नाही.
हेही वाचा: Ajit Pawar : दादांच्या निधनानंतर कट्टर समर्थकानेही त्यागले प्राण, अंत्यविधीवरुन परतताना करुण अंत
महापौरपदाच्या शर्यतीत सध्या अनेक नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून राजेश चानपूर आणि राजेंद्र चौधरी यांची नावे आघाडीवर आहेत, तर 'टीम ओमी कलानी'कडून अश्विनी निकम आणि डिंपल ठाकूर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, अंतिम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हाती असल्याने, 'मातोश्री'वरून कोणता आदेश येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज नामनिर्देशन पत्रासोबत नक्की कोणाचे नाव पुढे येते, यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील.
दुसरीकडे, शेजारच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतही महापौरपदावरून 'रस्सीखेच' सुरू आहे. तेथे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव आहे. केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपची युती असली, तरी शिवसेनेच्या अंतर्गत गटातच चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेकडे किरण भांगले आणि हर्षाली थविल असे दोन प्रबळ दावेदार आहेत. एका गटाकडून किरण भांगले यांच्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे, तर दुसऱ्या गटाने हर्षाली थविल यांच्यासाठी जोर लावला आहे. त्यातच मनसेची साथ मिळाल्याने समीकरणे आणखी रंजक झाली आहेत.
थोडक्यात, आजचा दिवस उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांसाठी राजकीयदृष्ट्या 'सुपर फ्रायडे' ठरणार आहे. उल्हासनगरमध्ये शिंदे गट त्याग करणार की हट्ट पुरवणार? आणि कल्याणमध्ये भांगले की थविल? या प्रश्नांची उत्तरे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होतील. निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा: Virat Kohli: धक्कादायक! कोट्यवधी फॉलोअर्स असलेल्या विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक?