Vaishnavi Hagwane case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिस तपास आता अधिक गतीने सुरू झाला असून या प्रकरणातील आरोपी शशांक याच्यावर संशय अधिकाधिक गडद होत आहे. सध्या या प्रकरणात 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या साक्षींमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येत आहेत.
या प्रकरणातील सर्वात मोठा धक्का म्हणजे पोलिसांनी शशांकने वैष्णवीवर मारहाण करण्यासाठी वापरलेला पाईप ताब्यात घेतला आहे. याच पाईपचा वापर करून तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या (IPC) 118(2) या कलमाची वाढ केली असून गुन्ह्याच्या गंभीरतेत भर घातली आहे.
हेही वाचा: Vaishnavi Hagwane case : सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी नणंद करिश्मा हगवणे यांचे घनिष्ठ संबंध?
या कलमानुसार, कोणत्याही शस्त्राच्या सहाय्याने केलेली मारहाण ही अधिक गंभीर मानली जाते आणि त्यासाठी अधिक कडक शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पोलिस शशांक याच्यावर कठोर कारवाईसाठी तयारीत आहेत. पोलिसांकडे असलेला पाईप आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे, ज्याद्वारे खरेच त्याचा वापर झाला का, हे स्पष्ट होईल.
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूविषयीच्या अनेक बाबी आता समोर येत आहेत. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या असून मृत्यूचा संभाव्य कारण गळफास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शरीरावरच्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी शशांकसह इतर संबंधितांची हालचाल तपासण्यासाठी एक सविस्तर प्रवास नकाशा तयार केला आहे. 17 ते 22 तारखेपर्यंत शशांक आणि राजेंद्र हगवणे यांची ठिकाणानुसार प्रवासाची माहिती पोलिसांकडे आहे. त्यामध्ये हॉस्पिटल, लॉन्स, फार्महाऊस, लॉज, आणि शेतीच्या जागेचा समावेश आहे. अखेर पुण्यातील मुहूर्त लॉन्स येथून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
सध्या पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, साक्षीदारांच्या जबाबांनुसार घटनांची पुनर्रचना केली जात आहे.