Saturday, March 07, 2026 04:48:16 AM

Jalgaon Mayor: 'महिलांच्या समस्या आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार...'; जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी सांगितला शहराच्या विकासाचा रोडमॅप

महापौरपदी विराजमान झाल्यानंतर दीपमाला काळे यांनी 'जय महाराष्ट्र'शी बोलताना आपल्या प्राथमिकता स्पष्ट केल्या.

jalgaon mayor महिलांच्या समस्या आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी सांगितला शहराच्या विकासाचा रोडमॅप

Jalgaon Mayor: जळगाव शहराच्या सत्तेचे केंद्र असलेल्या 17 मजली महानगरपालिकेवर अखेर अपेक्षेप्रमाणे महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे यांची, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) मनोज चौधरी यांची शुक्रवारी जल्लोषात निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, मनोज चौधरी यांची निवड बिनविरोध झाली असून, दीपमाला काळे यांनी जळगावच्या 8 व्या महिला महापौर होण्याचा मान मिळवला आहे.

ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोष
निवड जाहीर होताच जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवडीचे अधिकृत शिक्कामोर्तब होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढली. गुलालाच्या उधळणीने संपूर्ण 17 मजली इमारत परिसर दणाणून गेला होता. पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या विकासाचा संकल्प केला.

हेही वाचा - Nashik Mayor : पहिल्या 100 दिवसांत संपूर्ण नाशिकचा दौरा करून...'; महापौरपदी निवड झालेल्या हिमगौरी आडके यांची पहिली प्रतिक्रिया

महिलांच्या समस्या आणि स्वच्छतागृहांना प्राधान्य
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर दीपमाला काळे यांनी 'जय महाराष्ट्र'शी बोलताना आपल्या प्राथमिकता स्पष्ट केल्या. त्या म्हणाल्या, "दोन वेळा नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर पक्षाने माझ्यावर ही मोठी जबाबदारी टाकली आहे. जळगावमधील महिलांच्या समस्या सोडवणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल. गेल्या टर्ममध्ये काही प्रस्ताव आणले होते, आता ते तातडीने पूर्ण करण्यावर माझा भर राहील. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना थेट जळगावकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."

तरुणांसाठी रोजगार आणि औद्योगिक विकासाचा 'प्लॅन'
जळगावमधील उद्योगांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना महापौर काळे यांनी भविष्यातील योजना मांडल्या. "जळगावमध्ये सध्या उद्योगांची कमतरता भासत आहे. माझ्या कार्यकाळात जास्तीत जास्त उद्योग आणि गुंतवणूक जळगावात कशी येईल, यासाठी मी महायुती सरकारसोबत मिळून प्रयत्न करेन. तरुणांना शहरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझ्यासाठी एक मोठे 'टास्क' आहे आणि ते मी पूर्ण करून दाखवेन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


सम्बन्धित सामग्री