Dharashiv Police Death : प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमयी वातावरणात कर्तव्य पार पाडत असतानाच एका पोलीस अधिकाऱ्याची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरात घडली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक (PSI) मोहन भीमा जाधव यांचे ध्वजारोहण सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. देशप्रेमाच्या उत्सवात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने प्रशासकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सलामी देत असतानाच काळाचा घाला
आज सकाळी उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता. राष्ट्रगीताचे स्वर गुंजत असताना आणि तिरंग्याला सलामी दिली जात असताना, पीएसआय मोहन जाधव अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. खाली पडताना त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उचलून जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण 'मॅसिव्ह हार्ट अटॅक' असल्याचे स्पष्ट केले आहे.
पदोन्नतीचा आनंद ठरला अल्पजीवी
मोहन जाधव यांची कारकीर्द निष्कलंक आणि प्रेरणादायी होती. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागात अनेक वर्षे प्रामाणिक सेवा दिली होती. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांना पीएसआय पदावर बढती मिळाली होती. नव्या पदाची जबाबदारी उत्साहाने सांभाळत असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. शांत, संयमी आणि आपल्या कामाप्रती कमालीची निष्ठा असलेला अधिकारी अशी त्यांची विभागात ख्याती होती.
हेही वाचा - Sanjay Shirsat : 'आम्ही युती धर्म पाळायचा आणि तुम्ही? फडणवीससाहेब काय आदेश द्यायचा तो द्या पण...'; संजय शिरसाट का संतापले?
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सर्व कर्मचारी शिस्तबद्ध पद्धतीने तिरंग्याला सलामी देत असताना जाधव अचानक कोसळताना दिसत आहेत. कर्तव्य बजावतानाच वीरगती मिळावी, अशा पद्धतीने या अधिकाऱ्याने जगाचा निरोप घेतल्याने सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.