Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या 48 तासांपासून हवामानाचा विचित्र खेळ सुरू आहे. ढगाळ वातावरण, वाढलेली उष्णता आणि दमट हवेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. हिवाळा आता निरोप घेण्याच्या तयारीत असतानाच पावसाचे संकेत मिळत असल्याने राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातून येणारे आर्द्र वारे, उत्तर भारतात सक्रिय झालेले वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यांच्या संयुक्त परिणामामुळे 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या हवामानात उलथापालथ होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा
17 फेब्रुवारीच्या रात्रीपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
कोकणात उष्णता, पण हवामान बदलणार
कोकण पट्ट्यात सध्या तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिक तीव्र आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून हवामानात बदल होण्याचे संकेत आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात काय स्थिती?
विदर्भ आणि मराठवाडा भागात सध्या पावसाची शक्यता कमी असली, तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात 1 ते 2 अंशांची घट नोंदवली जात आहे. मात्र ही थंडी फार काळ टिकणार नसून 18 फेब्रुवारीनंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारतात अतिवृष्टीचा धोका
महाराष्ट्रात केवळ पावसाचा शिडकावा अपेक्षित असताना, दक्षिण भारतात मात्र मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून, काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही वाऱ्यांच्या वेगाच्या स्वरूपात जाणवू शकतो.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
हवामानातील या बदलांमुळे शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. अचानक पावसामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. पुढील हवामान अंदाजांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.