Weather Update: पावसाने पहाटेपासून हजेरी लावली आहे. मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळ कमजोर झालं असलं तरीसुद्धा त्याचे परिणाम अजूनही आहेत. तर अरबी समुद्रातील डिप डिप्रेशन गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. कमी दाबाचं क्षेत्र, सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि डिप डिप्रेशन यामुळे हवामानात वेगानं बदल होत आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या सक्रिय असलेल्या हवामानामुळे मोठा बदल झाला आहे. दोन मुख्य हवामान प्रणाली सध्या सक्रिय असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांवर होणार आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रातील 'डिप्रेशन' आणि उत्तर-पश्चिम झारखंडजवळील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पुढील 24 ते 48 तास अनेक राज्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. 3 नोव्हेंबरपासून उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत आहे. त्याचा परिणाम देखील हवामानावर होणार आहे.
हेही वाचा:New Delhi New Rules: राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण आणि सायबर गुन्ह्यांवर सरकारची कडक पावले
अरबी समुद्रातील डिप्रेशन हे सध्या वेरावळ (गुजरात) पासून 300 किमी नैऋत्येकडे आहे. हे हळूहळू गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकणार आहे, परंतु पुढील 24 तासात ते कमकुवत होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे काल पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडजवळ होते, जे आता उत्तर-पश्चिम झारखंड आणि आसपासच्या क्षेत्रांवर आले आहे. हे पुढील 12 तासांत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे आज गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रावर पुढील 36 तास परिणाम
महाराष्ट्र आणि गुजरातला पुढील 36 तास हवामानातील बदलांमुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे दक्षिण गुजरातमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील. मात्र, 2 नोव्हेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. 3 नोव्हेंबरपासून मराठवाडा, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये केवळ ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिण म्यानमार किनाऱ्याजवळ एक सायक्लोनिक सर्कुलेशन तयार झाले आहे, ज्यामुळे पुढील 48 तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबरच्या रात्रीपासून एक 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पश्चिम हिमालयीन भागांवर परिणाम करेल. 4 नोव्हेंबरपासून या प्रणालींमुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 5 नोव्हेंबरपासून पाऊस राहणार नाही कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे.