Wednesday, July 09, 2025 09:59:18 PM

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डब्याची निर्मिती

मुंबई लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 105 लोकलमध्ये मालडबे बदलून विशेष डबे तयार केले जाणार असून, वर्षभरात काम पूर्ण होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डब्याची निर्मिती

मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे 50 हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. परंतु त्यांच्या सोयीसाठी एका लोकलमध्ये केवळ 14 आरक्षित आसने उपलब्ध आहेत. गर्दीच्या वेळी या आसनांपर्यंत पोहोचणे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत कठीण ठरते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकलच्या एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 105 लोकलमधील प्रत्येकी एका मालडब्यात बदल करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 5.4 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हे बदल एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा संकल्प पश्चिम रेल्वेने सोडला आहे.

हेही वाचा: Mumbai IMD Weather Alert: मुंबईत पावसाचा कहर; कोणते रस्ते जलमय? लोकल ट्रेन चालू आहेत का? सविस्तर वाचा

गेल्या काही वर्षांत लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. काही वेळा प्रवासादरम्यान विविध कारणांमुळे प्रवाशांचा मृत्यू होतो. गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही. गर्दीच्या लोंढ्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरतो. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलने प्रवास करणे अधिक कठीण बनले आहे.

मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रत्येक लोकलमध्ये काही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित असतात. मात्र, गर्दीमुळे त्या जागांपर्यंत पोहोचणे अवघड असते. याच पार्श्वभूमीवर, अपंग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाने न्यायालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच लवकरात लवकर कार्यादेश देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यानुसार आता पश्चिम रेल्वे प्रशासनाने या कामाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Mumbai IMD Weather Alert: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, IMD कडून ऑरेंज अलर्ट

सध्या चर्चगेटच्या टोकापासून लोकलच्या तिसऱ्या आणि 12 व्या डब्यामध्ये 14 जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत. आता चर्चगेटच्या टोकापासून लोकलच्या सातव्या डब्यातील मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात रुपांतर करण्यात येणार आहे. यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.

मालडब्यात सुधारणा केल्यानंतर 13 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आणि 91 प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यामुळे गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे लोकलमध्ये चढता व उतरता येईल. हे बदल टप्प्याटप्प्याने 105 सामान्य लोकलच्या डब्यांमध्ये केले जातील. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण 105 लोकल आहेत, त्यापैकी 90 लोकल 12 डब्यांच्या तर 15 लोकल 15 डब्यांच्या आहेत. या बदलांदरम्यान इतर मालडबे कायम ठेवले जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री