Ajit Pawar Plane Crash CCTV Footage : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आपल्या बालेकिल्ल्यात जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विमान कोसळताचं आगीच्या भक्षस्थानी पडलं. विमानाने पूर्णपणे पेट घेतला होता. स्फोटाचा आवाज आल्याने जवळपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विमान संपूर्णपणे जळून खाक झालं होतं. विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : "बाबा, मी दादांना सोडून पुढे नांदेडला जाईन", 'तो' ठरला अखेरचा फोन!, वडिलांनी सांगितली पिंकी माळीची अखेरची आठवण
दरम्यान, मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर बारामतीजवळ आलेले विमान लँडिंगदरम्यान अचानक नियंत्रण सुटल्याने कोसळले आणि काही क्षणांतच मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. जिथं विमान अपघात झाला तेथून काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या सीसीटीव्हीमध्ये सदर अपघात कैद झाला आहे.
तथापी, अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा पसरल्या. परिसरातील लोकही मदतीसाठी धावले, मात्र आग इतकी प्रचंड होती की क्षणात सर्वकाही संपले. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताची भीषणता स्पष्ट होते. विमान जमिनीवर कोसळताच आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्याचं व्हिडिओत दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, स्फोट झाल्यानंतर आम्ही मदतीसाठी पुढे आलो, मात्र आग अत्यंत भयानक होती. आगीचा भडका इतका मोठा होता की तात्काळ मदत करणे अशक्य झाले होते, असेही तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितलं.