सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाला अवघे 48 तास उरले आहेत. अशातच मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 'PADU' चा वापर होणार असून, यामुळे मतदारांसाठी काय बदलणार? घ्या...
महानगरपालिका निवडणुकीत 227 प्रभागांसाठी मतदान होण्यापुर्वी मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासनाने मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू यांनी विकसित केलेल्या PADU या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा- Raj Thackeray On Gautam Adani: "म्हणून काय मी त्यांना घरातून हाकलून देऊ?" अदानींवरील टीकेमुळे भाजपने केलेल्या पोस्टवर राज ठाकरेंनी ठणकावलं
'PADU' म्हणजे नेमकं काय?
'पाडू'चा उपयोग कंट्रोल युनिटमधून डेटा कागदावर प्रिंट काढण्यासाठी केला जातो. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला किंवा त्यातून निकाल दिसण्यात अडचण आली, तर 'पाडू' यंत्रात सर्व डेटा कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतो. यामुळे मतमोजणीची प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येऊ शकतो. मतमोजणी करताना सर्वात प्रथम कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मत तपासण्याची प्रक्रिया होते, मात्र यात काही अडचण येत असेल किंवा निकाल दिसत नसेल तर 'पाडू' यंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते. मुंबई महापालिकेला अशा 140 यंत्रांचा पुरवठा करण्यात आला आहे.