BMC Election 2026 Result : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 227 जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाने एकट्या 100 जागांचा टप्पा पार केला असून, महायुती आता बहुमताच्या (114 जागा) अगदी जवळ पोहोचली आहे. दुसरीकडे, मुंबईवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याचे 'ठाकरे बंधूंचे' (उद्धव आणि राज ठाकरे) स्वप्न भंगताना दिसत आहे. मुंबईकरांनी या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला नाकारल्याचे स्पष्ट चित्र असून, भाजपचा झेंडा फडकवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या वाट्याला मोठा पराभव आला आहे. ठाकरे बंधूंनी मुंबईत अनेक ठिकाणी प्रचार सभा घेत मुंबईच्या विकासासाठीचा रॉडमॅप मांडला होता. परंतु, मुंबईकरांनी ठाकरे ब्रँडला नाकारल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. BMC निवडणुकीत ठाकरे बंधूच्या पराभवाची नेमकी कारणं कोणती ते जाणून घेऊयात.
ठाकरे बंधूंच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे
1. विकासाच्या ठोस आराखड्याचा अभाव
ठाकरे बंधूंनी सभांमधून भावनिक आवाहन आणि विरोधकांवर टीका केली असली तरी, मुंबईच्या विकासासाठी त्यांचा नेमका 'रोडमॅप' काय आहे, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ते अपयशी ठरले. नागरिकांना दैनंदिन समस्यांवरील उत्तरांपेक्षा राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये जास्त रस नव्हता, असे या निकालावरून दिसून येते.
हेही वाचा - BMC Election Results 2026: मुंबईत 'ठाकरे फॅक्टर' फेल? महायुतीची सुसाट मुसंडी; देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत सत्तांतराचे संकेत?
2. अदानींवरील टीकेचा उलटा परिणाम
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या प्रकल्पांवर सातत्याने तोफ डागली. मात्र, याचा सर्वसामान्य मुंबईकर मतदारांवर विपरीत परिणाम झाला. मुंबई हे रोजगाराचे शहर असल्याने, "जर मोठ्या उद्योजकांनाच विरोध झाला, तर भविष्यात नोकऱ्या आणि रोजगाराचे काय?" अशी भीती मतदारांमध्ये निर्माण झाली. हा आर्थिक मुद्दा ठाकरे बंधूंच्या अंगाशी आल्याचे मानले जात आहे.
3. भुयारी मेट्रोवरून केलेले राजकारण
मुंबईतील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली 'भुयारी मेट्रो' ही फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. उद्धव ठाकरे यांनी या मेट्रो प्रकल्पावर टीका करणे मुंबईकरांना फारसे रुचले नाही. वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या प्रकल्पाला विरोध करणे विकासाच्या आड येणारे आहे, अशी भावना मध्यमवर्गीय मतदारांमध्ये निर्माण झाली.
हेही वाचा - BMC Election Results 2026 : मनसेच्या संदीप देशपाडेंची खास पोस्ट, "विजय असो वा पराभव, 'महाराष्ट्र सैनिकां'चा आम्हाला..."
4. फडणवीस-शिंदे सरकारची विकासकामे
गेल्या काही वर्षांत मुंबईत कोस्टल रोड, अटल सेतू आणि मेट्रोच्या जाळ्याचे काम वेगाने पूर्ण झाले आहे. ही सर्व विकासकामे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्यक्षात करून दाखवली. "केवळ बोलण्यापेक्षा करून दाखवणाऱ्यांना" मुंबईकरांनी प्राधान्य दिले, ज्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची ताकद वाढली.
5. युतीची घोषणा करण्यास झालेला उशीर
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती ही मतदानाला अवघे 20 दिवस उरलेले असताना जाहीर झाली. दोन दशकांच्या राजकीय वैरानंतर दोन्ही भावांना एकत्र येऊन प्रचार करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हा वेळ अत्यंत कमी होता. मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात हा कमी पडलेला अवधी पराभवाचे एक महत्त्वाचे कारण ठरला.