Gunaratna Sadavarte : राज्यातील 29 महापालिकांच्या रणधुमाळीत आता ठाकरे विरुद्ध सदावर्ते असा नवा संघर्ष पेटला आहे. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त सभा पार पडल्यानंतर, मुंबईतील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. ठाकरे बंधूंची सभा म्हणजे केवळ करमणूक असून, त्यांचे राजकारण बुडत्या जहाजासारखे आहे, अशी जहरी टीका सदावर्ते यांनी केली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला.
'राज ठाकरे आणि ओवैसी एकाच माळेचे मणी'
सदावर्ते यांनी राज ठाकरेंची तुलना थेट एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्याशी केली. ते म्हणाले, "राज ठाकरे आणि ओवैसी हे दोघेही महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचे काम करत आहेत. जसा जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर शेतात बेडूक डराव-डराव ओरडू लागतात, तसेच निवडणुका आल्या की हे दोन 'राजकीय बेडूक' बाहेर येतात आणि ओरडायला लागतात."
हेही वाचा - Prakash Ambedkar : 'संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी..' भाजपवर कडाडून टीका करत प्रकाश आंबेडकरांचा एल्गार
गौतमी पाटीलच्या नृत्याशी तुलना
सभेतील गर्दीवर भाष्य करताना सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केले. "गौतमी पाटीलच्या नृत्यावरही लोक शिट्या वाजवतात आणि आनंद व्यक्त करतात, याचा अर्थ असा नाही की तिला राजकीय गांभीर्य आहे. ठाकरे बंधूंच्या सभांची अवस्थाही तशीच आहे. लोक केवळ मनोरंजनासाठी तिथे जातात. या युतीचा एकतरी उमेदवार निवडून येईल का?" असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - BMC Election 2026: मुंबई महापालिका रणसंग्राम! जाणून घ्या कोणत्या प्रभागात किती जागांमध्ये लढत?
उद्योजकांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना इशारा
मुंबईतील उद्योगांच्या प्रश्नावर बोलताना सदावर्ते अधिक आक्रमक झाले. मुंबईतील मोठे व्यवसाय बाहेर जाण्यास हे लोकच जबाबदार आहेत. उद्योजकांनी स्वतःचे काम वाढवण्यासाठी राज ठाकरेंच्या परवानगीची वाट पाहायची का? तुम्ही अदानींसोबत कौटुंबिक फोटो काढता तेव्हा चालतं, मग आताच विरोध का? राज ठाकरेंनी आपल्या मर्यादा ओळखून राहावे, त्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, असा इशाराही सदावर्ते यांनी यावेळी दिला.