मुंबई: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने कठोर निर्णय घेतला. यासह, भारताने सिंधू पाणी वाटप करार रोखल्यानंतर पाकिस्तानला दिवसा ढवळ्या तारे दाखवण्यासाठी भारताने जम्मू आणि काश्मीर येथील चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करून पाकची पाणीकोंडी केली.
यादरम्यान, नागरिकांमध्ये सतर्कता वाढविण्यासाठी भारत सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रिलचा सराव राबविण्यात येणार आहे. त्यासाठी देशासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मॉक ड्रिलचा सराव झाला.
मुंबईतील 'या' ठिकाणी मॉक ड्रिल:
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पोलिसांकडून मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला होता. त्यानंतर, नवी मुंबई येथील उरण शहरातील एनआय हायस्कूलमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात, याचा आढावा घेण्यात आला होता. या मॉक ड्रिलमध्ये पोलीस, सिव्हिल डिफेन्स, रायगड डीआरएफ (DRF), नागरी संरक्षण दल आणि वैद्यकीय सेवा सहभागी झाले होते. अलर्ट सायरन वाजविण्यापासून ते बॉम्बबार्डिंग झाल्यास तेथील परिस्थिती कशी हाताळायची यासंदर्भातील सराव या मॉक ड्रिलमध्ये करण्यात आला होता.
यासह, नागरी संरक्षण दलाचे पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांनी घोषणा केली की, 'आज रात्री 8 वाजता अणुशक्ती नगर BARC येथे 'ब्लॅक आउट' मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यासह, पुढील 5 दिवस मुंबईमध्ये मॉक ड्रिल सुरू ठेवण्यात येणार आहे.'
हेही वाचा: पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कोणती अचूक शस्त्रे वापरली? जाणून घ्या
रत्नागिरीतील 'या' ठिकाणी मॉक ड्रिल:
जिल्ह्यातील रत्नागिरी तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वे स्टेशन, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यात मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला. नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला. यासह, आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्राथमिकोपचार या गोष्टींची देखील चाचणी करण्यात आली.
यादरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विभाग, बंदरे, मेरीटाइम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा: भारताच्या एअर स्ट्राईक हल्ल्यावर संजय राऊत चिडिचूप; राहुल गांधींना सुद्धा करावं लागलं हवाई हल्ल्याचं कौतुक
पुण्यातील 'या' ठिकाणी मॉक ड्रिल:
पुण्यात मॉक ड्रिलची तयारी पूर्ण झाली असून, 7 मे रोजी पुण्यातील विविध ठिकाणी मॉक ड्रिल झाले आहेत. त्याप्रमाणे, विधान भवन, मुळशी तहसील कार्यालय, तळेगाव, पीएमसी (PMC) इमारत, वणाज कंपनी या ठिकाणी मॉक ड्रिल झाले. यादरम्यान, विधान भवन येथे झालेल्या मॉक ड्रिलमध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते. पुण्यात होणाऱ्या मॉक ड्रिलसाठी एनडीआरएफ (NDRF), आर्मी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलिस सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.