Devendra Fadnavis : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी असलेल्या चुरशीच्या लढतीत भाजपने बाजी मारल्यानंतर, 'पुण्याचा दादा कोण?' या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पुण्याचा दादा हा फक्त तेथील जनताच आहे, आम्ही फक्त तिचे सेवक आहोत.
'लँडस्लाईड व्हिक्टरी'ने विरोधकांचे आडाखे कोलमडले
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विजयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'पुणेकरांनी भाजपवर जो अभूतपूर्व विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. हा विजय म्हणजे केवळ सत्ता मिळवणे नसून वाढलेली जबाबदारी आहे. महापौर निवडीच्या दुसऱ्याच दिवसापासून आम्ही आमचे पुण्याचे 'व्हिजन' प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मैदानात उतरू,' असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, अनेक राजकीय विश्लेषकांनी चुरशीची लढत वर्तवली होती, मात्र पुणेकरांनी भाजपला एकतर्फी कौल देऊन सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा - Yashwant Killedar : "शाब्बास, छान.." राज ठाकरेंनी दिली यशवंत किल्लेदारांना शाबासकी; दादरचा बालेकिल्ला राखल्याचा जल्लोष
अजित पवारांच्या 'नाराजी'वर स्पष्टीकरण
अजित पवार यांच्या पराभवामुळे ते नाराज आहेत का? या चर्चेवर फडणवीसांनी पडदा टाकला. 'दादांशी माझी नुकतीच भेट झाली. राज्यपाल येणार असल्यामुळे ते कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी तशी कल्पना मला आधीच दिली होती,' असे सांगत त्यांनी महायुतीत सर्व आलबेल असल्याचे संकेत दिले.
हेही वाचा - Shahaji Khupse : 'मी फक्त विकासावर बोललो, कुणावरचं टीका...'; ठाण्यात जाएंट किलर ठरलेल्या शहाजी खुपसेंनी सांगितलं विजयाचं गुपित
राष्ट्रवादीला नाकारलं नाही, भाजपला स्वीकारलं!
पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने नाकारले का? या प्रश्नावर फडणवीसांनी अत्यंत मुत्सद्दी उत्तर दिले. ते म्हणाले, 'मी असे म्हणणार नाही की त्यांना नाकारले, तर मी असे म्हणेन की पुणेकरांनी भाजपच्या कार्यपद्धतीला आणि नेतृत्वाला मनापासून स्वीकारले आहे.'