Raj Thackeray On EC : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या 'पाडू' (Printing Auxiliary Unit) या नव्या मशीनवरून आणि मतदानाच्या दिवसापर्यंत भेटीगाठी घेण्याच्या नव्या नियमावरून राज यांनी संताप व्यक्त केला असून, सरकार आणि आयोगाच्या 'साट्यालोट्या'वर गंभीर आरोप केले आहेत.
'PAU' मशीनचे गुपित काय? राज यांचा सवाल
निवडणूक प्रक्रियेत अचानक समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या मशीनवरून राज ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरले. ते म्हणाले, "ईव्हीएमसोबत एक नवीन युनिट लावले जात आहे, ज्याला 'पाडू' (PAU) म्हटले जाते. पण हे मशीन नक्की काय आहे? ते कसे दिसते? त्याचे काम काय? हे कोणत्याही राजकीय पक्षाला का दाखवण्यात आले नाही? लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकून ही कोणती बेबंदशाही सुरू आहे?" असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला.
आचारसंहितेचा खून आणि आयोगाची मेहेरबानी
प्रचार संपल्यानंतरही मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याच्या नवीन 'नोटिफिकेशन'वर राज यांनी सडकून टीका केली. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवार मतदारांना भेटू शकतात, हा नियम अचानक कोठून आला? लोकसभा किंवा विधानसभेला हा नियम नव्हता, मग महापालिकेलाच का? पत्रके वाटायला बंदी पण भेटीला मुभा, याचा अर्थ 'पैसे वाटायला' परवानगी दिली आहे का? असा संशय त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग हे स्वतंत्र नसून सध्याच्या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - BMC Election Results: 227 वॉर्ड अन् 5 टप्पे... मुंबई महानगरपालिकेचा निकाल लांबणीवर? असा आहे प्रशासनाचा नवा 'मास्टर प्लॅन'
शिवसैनिक आणि मनसेसैनिकांना सतर्कतेचा इशारा
राज ठाकरे यांनी केवळ मनसे सैनिकांनाच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनाही एकत्र येण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक पॅम्प्लेटच्या आत पैसे ठेवून वाटप करत आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे सर्व सैनिकांनी प्रभागात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - Akola Mahapalika Election : तिळाचे लाडू आणि साड्यांचं वाटप, अकोल्यात मतदारांना 'गूळ' लावण्याचा प्रयत्न?
राजकीय खळबळ
निवडणूक प्रक्रियेतील या बदलांमुळे निवडणुकीच्या काही तास आधी राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांनीही या मशीनबाबत आधीच पत्र व्यवहार केल्याचा संदर्भ देत राज यांनी विरोधकांच्या एकजुटीचे संकेत दिले आहेत.