Wednesday, April 22, 2026 10:38:52 PM

Aditi Tatkare On NCP Merger: 'वहिनींच्या नेतृत्वाचा विचार का झाला नाही?' राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आदिती तटकरेंचा शरद पवार गटाला सवाल

आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, अजित दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काम सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या सुरू आहे.

aditi tatkare on ncp merger वहिनींच्या नेतृत्वाचा विचार का झाला नाही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आदिती तटकरेंचा शरद पवार गटाला सवाल

Aditi Tatkare On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र, या विलीनीकरणावरून आता राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला असून तटकरे कुटुंबीयांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या विलीनीकरणाच्या चर्चेवर आश्चर्य व्यक्त करत, दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आमच्या पक्षात काय चालले आहे, हे पाहण्यासाठी वेळ कोठून मिळतो, असा बोचरा सवाल शरद पवार गटाला केला आहे.

सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर विश्वास; आदिती तटकरेंचा पलटवार
आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, अजित दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काम सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या सुरू आहे. "आम्ही सर्व कार्यकर्ते सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेसाठी काम करत आहोत. मात्र, दादांच्या निधनानंतर लगेचच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू करून एक प्रकारचे संभ्रमाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले गेले," असा आरोप त्यांनी केला. पवारांच्या पक्षातील नेत्यांमध्ये ज्या पद्धतीने संघटित चर्चा झाली, तशी कोणतीही अधिकृत चर्चा आमच्या पक्षात झालेली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. "जर विलीनीकरण करायचे होते, तर सुनेत्रा वहिनींना नेते म्हणून स्वीकारण्याची भूमिका समोरच्या बाजूने का आली नाही?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'विलीनीकरणाला माझा विरोध नव्हता, पण...'; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. "विलीनीकरणाच्या चर्चेची मला पूर्ण कल्पना होती आणि माझा त्याला विरोधही नव्हता," असे तटकरे यांनी मान्य केले. मात्र, ज्या पद्धतीने या चर्चा सार्वजनिक केल्या गेल्या, त्यामागील राजकीय अर्थ वेगळा असल्याचे त्यांनी सूचित केले. दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असतानाच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती देऊन विलीनीकरणाची अंतिम इच्छा आणि तारखा जाहीर केल्या, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दादा असताना आणि दादा नसतानाचे विलीनीकरण यात मोठा फरक
सुनील तटकरे यांनी भावूक होत सांगितले की, "ज्या वेळी या मुलाखती सुरू होत्या, त्या वेळी मी बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतो. मात्र, ज्या प्रकारे व्हिडिओ आणि माहिती बाहेर आणली गेली, त्यावरून काहीतरी वेगळेच शिजत असल्याचे लक्षात आले. दादा असताना होणारे विलीनीकरण आणि दादा नसताना होणारे विलीनीकरण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे." आम्ही सध्या भाजप आणि एनडीए (NDA) सोबत आहोत, असे स्पष्ट करत त्यांनी विचारणा केली की, विलीनीकरणाची चर्चा करणाऱ्यांनी वहिनींना (सुनेत्रा पवार) नेता म्हणून निवडण्याचा प्रस्ताव का दिला नाही?

हेही वाचा - Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय; सिंचन योजना, नदी पुनरुज्जीवन आणि विद्यार्थ्यांसाठी घोषणांचा पाऊस

राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह कायम
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील दरी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. विलीनीकरणाचा 'टोटल सिनॅरिओ' बदलला असल्याचे सांगत सुनील तटकरे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, सद्यस्थितीत विलीनीकरण होणे कठीण आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आपली स्वतंत्र ओळख टिकवून ठेवणार की भविष्यात काही वेगळी समीकरणे जुळणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या नावाखाली केवळ संभ्रम पसरवण्याचे काम सुरू असल्याचा दावा आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांनी केला आहे.
 


सम्बन्धित सामग्री