सांगली: सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री घडलेली एक खळबळजनक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या १७ दिवसांपूर्वी लग्न केलेल्या महिलेने नवऱ्याचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे.
मृत व्यक्तीचे नाव अनिल तानाजी लोखंडे (वय 45 ) असून तो एकता कॉलनी, प्रकाशनगर गल्ली क्र. 6 येथे राहत होता. अनिल याचा विवाह पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सातारा जिल्ह्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे (वय 27 ) हिच्यासोबत झाला होता. राधिका ही अनिल याची दुसरी पत्नी होती आणि दोघांचं लग्न 17 मे 2025 रोजी झालं होतं.
हेही वाचा: धर्मांतराच्या दबावाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती विवाहितेची आत्महत्या
वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 10 जून रोजी रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की राधिका हिने संतापाच्या भरात घरात असलेल्या कुऱ्हाडीने अनिलच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात अनिल लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि राधिका लोखंडे हिला ताब्यात घेतले. या खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अनिल लोखंडे यांच्या नातेवाईक मुकेश लोखंडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेच्या रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याच वेळी हल्ला घडला. पोलीस विविध अंगाने तपास करत असून आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा: शनिशिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी वाद; 14 जूनला सकल हिंदू समाजाचा आंदोलनाचा इशारा
मृत अनिल याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू कर्करोगाने झाला होता. त्यांना दोन मुली असून दोघींची लग्न झाली आहेत. त्यामुळे अनिल हे घरात एकटेच राहत होते आणि त्यांच्या देखभालीसाठी नातेवाईकांनी दुसरे लग्न लावून दिले होते. मात्र नव्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली नसतानाच एका दुर्दैवी आणि हिंसक घटनेने त्याची अखेर झाली.
सध्या परिसरात या घटनेची तीव्र चर्चा सुरू आहे. वटपौर्णिमा म्हणजे पत्नी पतीसाठी उपवास करत त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणारा दिवस, मात्र याच दिवशी पतीच्या जीवावर उठलेली पत्नी, हे वास्तव मन हेलावून टाकणारे आहे.पोलीस अधिक तपास करत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.