कोल्हापूर: गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक वादामुळे दोन्ही राज्यांतील नागरिक त्रस्त आहेत. अशातच, कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये महापुराचा धोका वाढला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी रविवारी दुपारी 1 वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 'या सर्वपक्षीय बैठकीमध्ये खासदार, आमदार आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काय म्हणाले विक्रांत पाटील-किणीकर?
या पत्रकार परिषदेत कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीच्या आयोजनाबद्दल माहिती देताना विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले की, 'अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत नेमलेल्या लवादानेही उंची वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे, त्याचा अहवाल प्रसिद्ध करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कर्नाटक शासन उंची वाढवण्यावर ठाम असून, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हे काम थांबले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही धरणाची उंची वाढू देणार नाही, त्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाईल.' यादरम्यान, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी दिली आहे.
खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह बाधित तालुक्यांचे आमदार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, ग्रीन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, शेतकरी संघटना आणि सहकारी संस्था सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
भयावह असलेला पाणीसाठा:
सध्या अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 125 टीएमसी आहे. तसेच, जर धरणाची उंची ५ मीटरने वाढवली गेली, तर अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 125 पासून 300 टीएमसीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुराची शक्यता आणि भीती आणखी वाढणार, अशी माहिती विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिली.
महापुराचा वाढता धोका:
2005, 2019, 2021 साली पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर झाला होता. यामध्ये अनेकांचे प्राण गेले, तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले. इतकंच नाही, तर यामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान देखील झाले आहे. या प्रत्येक महापुरात महाराष्ट्राने कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा आरोप केला होता.