Sushma Andhare: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "ज्यांनी बेकायदेशीरपणे सीडीआर काढला त्यांच्यावर कारवाई व्हावीच, पण या यादीत नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार?" असा रोकडा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
'एसआयटी'च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील तपासाच्या गतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत एसआयटीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. "जी माहिती माझ्यापर्यंत किंवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यापर्यंत पोहोचते, ती सरकारी यंत्रणेपर्यंत का पोहोचत नाही? पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींना वेळ दिला जातोय का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे हे खरातच्या संपर्कात असतानाही त्यांची चौकशी का टाळली जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
'वर्षा' बंगल्यावरील अघोरी विद्येची चर्चा
या प्रकरणाला आता अघोरी विद्येची जोड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर रेड्याचे शिंग पुरल्याची आणि मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुली मारल्याची धक्कादायक चर्चा सुरू आहे. "या अघोरी कृत्यांमागे नेमका कुणाचा फायदा आहे आणि यामागील सूत्रधार कोण, हे जनतेसमोर आलेच पाहिजे," अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
बड्या नावांच्या चौकशीची मागणी
अंधारे यांनी या प्रकरणात काही बड्या नावांकडे बोट दाखवले असून, त्यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तथापी, एकनाथ शिंदे यांचे सीडीआरमध्ये नाव असूनही मुख्यमंत्र्यांना चौकशीला का बोलावले जात नाही? महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांचे नाव येत असताना त्यांची चौकशी प्रलंबित का? खरातचा साथीदार नामकर्ण आवारे आणि सीए ललित पोकळे यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - Ravindra Chavan On BJP Foundation Day : 'सामान्य कार्यकर्त्यापासून प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास फक्त भाजपमध्येच शक्य'; रवींद्र चव्हाणांनी लेखाद्वारे व्यक्त केल्या भावना
नाशिकच्या बड्या अधिकाऱ्यांचा हात
सुषमा अंधारे यांनी केवळ राजकीय नेत्यांवरच नव्हे, तर नाशिकमधील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. या संपूर्ण गैरप्रकारात नाशिकच्या काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती एसआयटीला देऊनही प्रशासन गप्प का, असा सवाल त्यांनी केला. सातारा ड्रग्ज प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.