Sunday, June 15, 2025 12:44:23 PM

वैद्यकीय निष्काळजीपणाचा कहर; सिजेरियननंतर महिलेच्या पोटात राहिला कापडाचा तुकडा

वाशिमच्या खासगी रुग्णालयात सिजेरियननंतर महिलेच्या पोटात गॉज पीस विसरल्याचा प्रकार उघड; अनेक दिवस वेदना सहन केल्यानंतर संभाजीनगरमध्ये निदान, डॉक्टरांवर तक्रार दाखल.

वैद्यकीय निष्काळजीपणाचा कहर सिजेरियननंतर महिलेच्या पोटात राहिला कापडाचा तुकडा

छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय क्षेत्रात विश्वासाचा बंध फार महत्त्वाचा असतो. परंतु वाशिम जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने रुग्णांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खासगी रुग्णालयात सिजेरियन प्रसूती केल्यानंतर एका महिलेच्या पोटात गॉज पीस (कापडाचा तुकडा) विसरल्याची घटना उघडकीस आली आहे. या बेजबाबदार कृत्याचा परिणाम म्हणजे महिलेला अनेक दिवस प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या.

सुरेखा गणेश काबरा या महिलेची 10 मे रोजी रिसोड येथील एका खासगी रुग्णालयात सिजेरियन प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर त्यांच्या पोटात सातत्याने वेदना होत होत्या. प्रारंभी ही वेदना सामान्य असल्याचे मानून डॉक्टरांनी ती मूत्राशयाशी संबंधित असल्याचे निदान केले. त्यानुसार उपचारही सुरू करण्यात आले. मात्र काही दिवसांनीही वेदना कमी न झाल्याने सुरेखा यांनी वाशिम येथे सोनोग्राफी केली.

हेही वाचा: बीडच्या वैजनाथ मंदिरात मांसाहारी अन्न शिजवल्याची खळबळजनक घटना उघड; दोन कामगारांवर कारवाई

सोनोग्राफीचा अहवाल सिजेरियन करणाऱ्या डॉक्टरांना दाखवण्यात आला असता त्यांनी पुन्हा मूत्राशी संबंधित आजाराचे निदान करत औषधोपचार सुरु ठेवले. पण परिस्थितीमध्ये काहीही सुधारणा न झाल्याने सुरेखा यांनी अखेर छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.

तेथे डॉक्टरांनी सखोल तपासणी केली असता, त्यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले. तत्काळ शस्त्रक्रिया करून पोटातील गॉज पीस बाहेर काढण्यात आला. सुदैवाने वेळेत निदान झाल्यामुळे गंभीर धोका टळला.

या घटनेमुळे सुरेखा व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी रिसोड येथील संबंधित डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकारामुळे संबंधित रुग्णालयातील निष्काळजीपणा समोर आला असून, संबंधित डॉक्टरांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा गंभीर दुर्लक्षामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, याची जाणीव वैद्यकीय क्षेत्राला असणे आवश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री