बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केली, असा पीडितेचा आरोप आहे. ही मारहाण इतकी बेदम होती की, वकील महिलेच्या पाठीवर अन् अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत. पीडितेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळं मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली, सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केली आहे.
बीडमध्ये महिलेला सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काठी आणि रबरी पाईपनं मारहाण करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तक्रारी केल्यानं महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई करणार अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच बीड मुख्यमंत्र्यांच्या हातून गेलंय असे ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातही दिवसा-ढवळ्या हत्या, अपहरण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा : Nashik Income Tax officer Death: प्रियकराला मिठी, नवऱ्याची आत्महत्या
महिला आयोगाकडून मारहाण प्रकरणाची दखल
बीडमधील महिला वकील मारहाण प्रकरणाची दखल महिला आयोगाने असून आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशीचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. न्यायालयात सदर महिलेने केलेली खुनाच्या प्रयत्नाची केस मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याची राज्य महिला आयोगाची माहितीही चाकणकर यांनी दिली आहे.