Thursday, May 22, 2025 06:23:10 PM

यवतमाळचा शेतकरी मालामाल; झाडाने बनवलं करोडपती

यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याला झाडाने करोडपती बनवलं आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर काहींचा यावर विश्वासच बसणार नाही.

यवतमाळचा शेतकरी मालामाल झाडाने बनवलं करोडपती

संदेश कान्हू, प्रतिनिधी, यवतमाळ : यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याला झाडाने करोडपती बनवलं आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर काहींचा यावर विश्वासच बसणार नाही. पण यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या शेतकर्‍याला एका झाडामुळे कोट्यवधींचा फायदा झाला आहे. 

2013 -14 मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्त चंदनाचे असून त्याचे मूल्य समजावून सांगितल्यामुळे संपूर्ण शिंदे परिवार चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले. मात्र या झाडाचे मूल्य देण्याचे टाळाटाळ करत होते. त्यामुळे शिंदे परिवाराने या झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले. त्यावेळेस झाडाचे मूल्यांकन चार कोटी 97 लाख रुपये होते. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे परिवार न्यायालयात गेला. न्यायालयाने झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. 

हेही वाचा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी

पैशांचं झाड लागलंय का? हा वाकप्रचार तुम्ही अनेकदा वापरला असेल. पण पैशांचं झाड तुम्ही कधी पाहिलंय का? यवतमाळमध्ये चक्क एका झाडानं शेतकऱ्याला करोडपती केलंय. हबकलात ना? हो पण हे खरं आहे. पुसदमधल्या खर्शीतील शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित 7 एकर जमीन आहे. या शेतात एक झाड आहे. मात्र हे झाड नेमकं कशाचं हे केशव शिंदे यांना माहितच नव्हतं. मात्र 2013 मध्ये रेल्वेसाठीच्या सर्व्हेमध्ये झाडाची महती समोर आली आणि शिंदे परिवार चक्रावून गेला. 

रेल्वेसाठी जमीन अधिग्रहीत झाल्यानंतरही शिंदेंच्या हाती मोबदला काही पडला नव्हता. मात्र शिंदे परिवारानं वेळीच तत्परता दाखवून कोर्टाचा दरवाडा ठोठावला. झाडाची किंमत 4 कोटी 97 लाखांच्या घरात होती. यातील 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टानं दिले. 100 वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यापोटी मध्य रेल्वेनं 1 कोटींची रक्कम नागपूर खंडपीठात जमा केली आहे. तसंच झाडाचा पूर्ण मोबदला देण्यासाठी मूल्यांकन करण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. वडिलांनी शेतात लावलेलं झाड आपल्याला रातोरात करोडपती बनवेल याची कल्पनाही शिंदेंनी केली नसेल. मात्र म्हणतात ना जुनं ते सोनं...


 


सम्बन्धित सामग्री