मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सून दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत तसेच पुण्यात जोरदार पाऊस पडला. आता पावसाचा जोर आता कमी होत आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलोर्ट जारी केला आहे. तर कृषी विभागाने शेतकऱ्यांना काही भागात पेरणी थांबवण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत राज्यात मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. तथापि, 12 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कांदिवली परिसरात सोमवारी पाणीपुरवठा बंद
विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट -
दरम्यान, आज अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया यासह विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज मेघगर्जनेसह वादळे आणि जोरदार वारे येऊ शकतात. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार 1 जून ते 5 जून दरम्यान पाऊस सामान्यपेक्षा कमी राहील.
हेही वाचा - पुराच्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पाच जणांचे प्राण वाचवणारा 'खाकी वर्दीतला खरा हिरो'
कृषी विभागाने सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. जमिनीत अद्याप पुरेसा ओलावा न मिळाल्याने बियाणे आणि खतांचा अपव्यय होण्याचा धोका आहे, असंही कृषी विभागाने म्हटलं आहे.