किरण गोटूर. प्रतिनिधी. नाशिक: गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर 'भाजप वॉशिंग मशिन आहे' असा आरोप केला होता. यावर भाजप नाशिक महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील केदार यांनी मौन तोडले. भाजपवर घणाघात टीका करणाऱ्या विरोधकांना सुनील केदार यांनी प्रत्युत्तर दिले, ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
काय म्हणाले सुनील केदार?
'इतर राजकीय पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी काहीही अटी-शर्ती नाहीत. त्यासाठी मो.नं. 8800002024 डायल करून ऑनलाईन पद्धतीने देशातील कोणालाही भाजपचे प्राथमिक सदस्य होता येते. मात्र, भाजपच्या कामाची पद्धत पाहता, पक्षात सामील होणाऱ्यांसाठी कोणत्याही अटी राहणार नाहीत. त्यांना भाजपच्या पद्धती, ध्येये आणि धोरणे स्वीकारावी लागतील. तरच ते भाजपात येतील', असं वक्तव्य सुनील केदार यांनी केले.
हेही वाचा: कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने 59 किलोचा भव्य लाडू आई अंबाबाई चरणी अर्पण
पुढे सुनील केदार म्हणाले, 'इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. त्यानुसार वॉशिंग मशीनचा अर्थ असा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडून भाजपची कार्यपद्धती अंगिकारली पाहिजे. त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे? शेवटी लोकशाही पद्धतीच्या राजकारणात डोक्याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्व त्या पक्षात डोके किती संख्येने जास्त आहेत, तेही तितकेच महत्वाचे आहे. तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार विश्वासदर्शक ठरावात एका मताने पराभूत झाले होते. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी संगीत खुर्च्यांचा खेळ सुरू झाला. त्यामुळे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे जर कोणी भाजपमध्ये येऊन पक्षाची रचना आणि कार्यपद्धती स्वीकारली, तर त्यात काय अडचण आहे?'.