Sunday, July 13, 2025 11:17:52 AM

मासिक पाळीच्या त्रासांपासून सुटका देणारा 'हा' उपाय; जाणून घ्या

मासिक पाळीतील वेदना, थकवा व मूड स्विंग्ससाठी योग अत्यंत प्रभावी ठरतो. सुप्त बद्ध कोणासन, विपरित करणीसारखी योगासने हार्मोनल समतोल राखून मानसिक व शारीरिक आराम देतात.

मासिक पाळीच्या त्रासांपासून सुटका देणारा हा उपाय जाणून घ्या

Ease Menstrual Cramps: मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना पोटदुखी, पाठदुखी, थकवा, मूड स्विंग्ज, झोपेचा अभाव यांसारख्या समस्या जाणवतात. या त्रासांमुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. मात्र, या सर्व तक्रारींवर एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणजे योगाभ्यास. नियमित योग केल्याने केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही, तर मानसिक स्वास्थ्यालाही चालना मिळते.

योग केल्याने शरीरातील हार्मोनचे संतुलन राखले जाते. त्यामुळे मासिक पाळी अधिक नियमित आणि त्रासमुक्त होते. अनेक संशोधनांनी सिद्ध केलं आहे की योगमुळे मासिक पाळी दरम्यान होणारी वेदना, मानसिक चंचलता आणि तणाव यावर नियंत्रण मिळू शकतं. स्ट्रेचिंग आणि श्वसनाच्या तंत्रांमुळे शरीराला आराम मिळतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

योगाभ्यासाचे फायदे:

हार्मोनल समतोल राखतो

मूड स्विंग्स कमी करतो

झोप सुधारतो

पचन आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो

थकवा, पोटफुगवटा आणि अस्वस्थता कमी होतात

शरीर अधिक लवचिक आणि सक्षम बनतं


पाळी दरम्यान उपयोगी योगासने:

1. सुप्त बद्ध कोणासन: पाठीवर झोपून पायांचे तळवे एकत्र आणून गुडघे बाजूला सोडावे. या आसनामुळे मनःशांती मिळते आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो.


2. जठर परिवर्तनासन: पाठीवर झोपून दोन्ही गुडघे एकत्र वाकवून एक बाजूस वळवावे. कमरेखाली उशी ठेवल्याने पाठीला आधार मिळतो. हे पचन सुधारण्यास मदत करतं आणि पाठदुखी कमी करतं.


3. विपरित करणी: भिंतीजवळ झोपा आणि पाय भिंतीवर टेकवा. शरीर "L" आकारात असावं. हे रक्ताभिसरण सुधारते आणि मन शांत करतं.


4. सेतू बंधासन (ब्रिज पोज): पाय जमिनीवर ठेवून नितंब आणि कंबर वर उचला. या आसनामुळे गर्भाशय व हार्मोनल ग्रंथींचं आरोग्य सुधारतं.


5. धनुरासन: पोटावर झोपून, पाय मागे वाकवून दोन्ही घोटे हाताने धरा आणि छाती-पाय वर उचला. शरीर धनुष्यासारखं वाकतं. यामुळे पाळीच्या वेदना कमी होतात.

योग करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. चुकीची स्थिती घेतल्यास उलट त्रास होऊ शकतो. त्यामुळे सुरुवात करताना मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.

मासिक पाळी दरम्यान योग्य योगासने आणि श्वसन तंत्रांचा सराव केल्यास स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक दिलासा मिळू शकतो. या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून आरोग्य चांगलं ठेवणं शक्य आहे. योग्य वेळ, योग्य पद्धत आणि नियमित सराव  हे तीन घटक लक्षात ठेवले, तर मासिक पाळी अधिक आरामदायक होऊ शकते.


सम्बन्धित सामग्री