दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस

राज्यातील उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सोमवारपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. पुणे शहरात शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाकडून शनिवारी सकाळीच तसा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला.
अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून या अगोदर स्पष्ट करण्यात आले होते. ‘यास’ चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मोकळे केले आणि त्यांना चालना दिल्याचेही सांगण्यात आले आहे.