Thu. Jan 27th, 2022

राज्यात होणार मोफत लसीकरण

मुंबई: राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तसेच यापुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोफत लसीकरणाबद्दल संकेत दिले होते तसेच मोफत लसीकरणाबद्दलची मागणी ही सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटाला १ मेपासून कोरोना लस मिळणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपेंनी दिली. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. कारण सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं ही परिस्थिती निर्माण होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण १ मेपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र इच्छा असतानाही आम्हाला हे लसीकरण सुरू करता येत नसल्याचं टोपेंनी सांगितलं. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रं सुरू केली जातील. ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी १८ ते ४४ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *