Wed. Jun 16th, 2021

राज्यात आजपासून अंशत: अनलॉकला सुरुवात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात आजपासून मुंबई, ठाण्यासह बहुतांश भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. दुसऱ्या स्तरात असणाऱ्या ठाणे शहरातील दुकाने दिवसभर खुली राहणार असून, तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा असणार आहे.

निर्बंध शिथिल करताना मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई,पुणे, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र तिसऱ्या टप्प्यात येत असल्याने अत्यावश्यक सेवेतील आणि इतर दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. त्याचप्रमाणे उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील, मॉल्स, नाटय़गृहे बंदच राहणार आहेत.

खासगी कार्यालये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल. त्याचप्रमाणे लग्नसोहळ्यांना ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी आहे, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहू शकतील. व्यायामशाळा, केशकर्तनालय पूर्वनोंदणी करून ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील.

तसेच चौथ्या टप्प्यात असणाऱ्या पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *