नंदुरबार, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखानदार मनमानी पद्धतीने कारभार करत असून शेतकऱ्यांना वेढीस धरत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार पासून ऊसतोड बंद आणि वाहतूक बंद आंदोलनाला सुरुवात झाली. प्रकाश गावाजवळ साखर कारखान्यांकडे जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर आणि इतर वाहन हे शेतकऱ्यांनी अडवून धरलेली आहेत. कारखान्यांनी मागील वर्षी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना एफ आर पी दिला नाही. त्याचप्रमाणे यावर्षी कारखान्यांनी उसाचे दर जाहीर न करता ऊस तोडणीला सुरुवात केली आहे. ऊसाला प्रतिक्विंटल २९०० भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. उसाच्या दरासंदर्भात येत्या दोन दिवसात योग्य तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाच्या इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.