नाशिक, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल (ओव्हर ब्रिज) मध्यरात्री खचला असून बुधवारी पहाटे त्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळला असून यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. पण यामुळे मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे मागेच संरचनात्मक लेखापरीक्षण झाले होते. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. अभियंता संघटनेने वळण रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. या परिस्थितीत पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान जुन्या पुलाचा पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. सुरक्षा कथड्यासह मातीचा ढिगारा खाली गेला. यावेळी पुलावर वाहन नसल्याने दुर्घटना टळली आहे.
पुलाची जबाबदारी टोल कंपनीकडे
पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. गेल्या १५ वर्षांपासून हा पूल एमएमकेपीएल या टोल कंपनीकडे बीओटी तत्वावर हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम काम याच कंपनीकडे होते. हा पूल आणि महामार्ग धोकादायक असून वळण रस्ता करण्यात यावा, अशी बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे.